संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी आरोग्य जीवनशैलीत करा हे बदल..!

0
362

पद्मश्री डॉ. रमाकांत देशपांडे, कॅन्सर शल्यचिकित्सक एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट यांचा हा सुंदर लेख

प्रत्येक संसर्गजन्य आजार म्हणजे स्वतंत्र समस्या असते. आतापर्यंत जगभरात अनेक प्रकारच्या साथीच्या रोगांनी धुमाकूळ घातलाय. यात क्षयरोग, प्लेग, कुष्ठरोग, झिका व्हायरस आणि इबोला यांसारख्या आजारांचा समावेश आहे. याशिवाय काही वर्षांपूर्वी सार्स या संसर्गजन्य आजारानेही समाजातील लोकांना पोखरून काढले होते. पण आता कोरोना व्हायरस हे एक नवीन आव्हान जगासमोर उभे ठाकले आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसून येतात. परंतु, आता 70 टक्के लोकांमध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणे आढळून येत नाहीये. अशा स्थितीत कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तीचा आजार कळून न आल्यास ती व्यक्ती २४ तासांत १० लोकांना संसर्गित करते. यामुळे कोरोना व्हायरस रूग्णांचा आकडा दुपटीने वाढू लागला आहे.

कोविड-19 या आजाराचा प्रभाव सार्स विषाणूपेक्षा कमी आहे. परंतु, हा संसर्गजन्य आजार झपाट्याने पसरतोय. यामुळेच कोरोना व्हायरस ही समस्या निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस या विषाणूचा प्रसार वाढतोय. त्यामुळेच सध्या प्रत्येक व्यक्तीला या आजारापासून वाचवण्यासाठी ‘सामाजिक दुरावा अभियान’ (सोशल डिस्टसिंग) राबवले जाते आहे.

कोविड-१९ हा आजार नेमका कशामुळे होतोय, हे अद्यापही सिद्ध झालेले नाही. मात्र, चीन, इटली आणि फ्रान्स यांसारख्या देशातील परिस्थिती पाहता एखाद्या व्यक्तीला या आजाराचा संसर्ग झाल्यास नेमकं काय करावं आणि काय करू नयेत, याबाबत आपल्याकडे कुठल्याही प्रकारचे ठोस धोरणात्मक उपाययोजना नाहीत. कोरोना व्हायरसमुळे आज संपूर्ण जग ठप्प झाले आहे. घरबसल्या कोरोनाचे पटकन निदान व्हावेत, यासाठी कोणतीही कोरोना चाचणी अद्याप विकसित झालेली नाही.

महत्त्वाचं म्हणजे, कोरोना व्हायरस संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात भारताने किंवा महाराष्ट्राने अद्याप प्रवेश केलेला नाही. परंतु, लॉकडाऊननंतरही नुकत्यात पार पडलेल्या एका सामुदायिक कार्यक्रमामुळे लोक एकत्रित आले होते. यामुळे भारतात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. सध्याची परिस्थिती खूपच बिकट असताना राज्य सरकार खूपच चांगल्या पद्धतीने ही स्थिती हाताळत आहेत.

कोरोना व्हायरसचा सर्वाधिक मृत्यूचा धोका हा 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना, मधुमेह, कॅन्सरग्रस्त, लठ्ठपणा व हृदयरोगींना आहे. भारतात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 60 वर्षावरील लोकांची संख्या 20 टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे अन्य देशाच्या तुलनेत भारतात कोरोना मृत्यूदर खूपच कमी आहे. मात्र, कर्करूग्णांचा विचार केल्यास कोरोनाचा धोका यांना अधिक असू शकतो.

कारण, कॅन्सर रूग्णांवर शस्त्रक्रिया करणं हे खूपच जिकिरीचे काम असते. त्यातच कॅन्सरशी झुंज देणाऱ्या व्यक्तीला कोविड-१९ ची लागण झालेली असल्यास अशा स्थितीत शस्त्रक्रिया केल्यास रूग्ण बरा होण्याची शक्यता फार कमी असते. या प्रकरणांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यूदर 20 टक्क्यांनी वाढू शकतो.

कुठल्याही प्रकारचा कर्करूग्णांवर किमोथेरपी, रेडिथेरपी आणि शस्त्रक्रिया अशा तीन टप्प्यावर उपचार केले जातात. कॅन्सर शस्त्रक्रियेनंतर रूग्णाची प्रकृती सुधारायला वेळ लागतो. परंतु, रूग्णाला एखादा संसर्ग झाल्यास मृत्यूचा धोका वाढतो. सध्या सरसकट कर्करूग्णांची शस्त्रक्रिया केली जात नाही. ज्या व्यक्तींना शस्त्रक्रियेची गरज आहे, अशा कर्करूग्णांची पहिल्यांदा कोरोना चाचणी केली जात आहे. 24 तासानंतर चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच रूग्णावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. अनेकदा एन्डोस्कोपी आणि लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया (दुर्बिणीद्वारे) सुद्धा करण्यात येतात. अशावेळी अनेक वायूंचा वापर केला जातो. परंतु, यामुळे रूग्णाला विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका अधिकपटीने असतो. याशिवाय, रूग्ण पॉझिटिव्ह असल्यास त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि नर्सेसला सुद्धा या विषाणूची लागण होण्याची दाट शक्यता असते. यामुळे, सद्यस्थितीत एन्डोस्कोपी आणि लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करणे शक्य नाही.

विशेषतः कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र रूग्णालये असावीत. ज्या रूग्णालयात अन्य आजारांच्या रूग्णांवर उपचार होतात त्याठिकाणी कोरोनाबाधित रूग्ण ठेवू नयेत. जेणेकरून या विषाणूचा संसर्ग रूग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस व अन्य कर्मचाऱ्यांना होण्यापासून रोखता येईल. याशिवाय संसर्गाची लागण टाळण्यासाठी राज्य सरकारद्वारे पीपीई किट आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरवले जात आहे. परंतु, हे किट एकदाच वापरू शकतो. या पीपीई किटची किंमत साधारणतः 1500 रूपये इतकी आहे. एका शस्त्रक्रियेसाठी आठ ते दहा लोकांना (डॉक्टर्स, नर्सेस अन्य कर्मचारी मिळून) अंदाजे 13 ते 15 हजार रूपये खर्च येतो. दररोज चार शस्त्रक्रियेसाठी लाखो रूपये खर्च होतात. त्यामुळे हे किट परवड्याजोगे नाही. मात्र, आता सरकारने चेहऱ्याचे मॉस्क उत्पादन करायला सुरूवात करून काही दिवसांत ही परिस्थिती बदलेल. पण, कोरोना रूग्णांचं आयसोलेशन ही स्थिती सहा महिने तशीच राहिल. जोपर्यंत या कोरोना व्हायरसवर कुठल्याही प्रकारची लस तयार होत नाही.

सांगायचे तात्पर्य म्हणजे, टीबी-सार्स आणि कोरोना व्हायरस हे आजार संसर्गजन्य आहे. पण टीबीची लागण महिना किंवा वर्षभराने व्यक्तीला होते. टीबी रूग्णाची योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास इतरांना या रोगाचा संसर्ग होण्याचा धोका फार कमी असतो. शिवाय, सार्स हा गंभीर स्वरूपाचा आजार झाल्यास यातून वाचणे खूपच अवघड असते. परंतु, कोरोना व्हायरस या आजारात 70 टक्के रूग्णांमध्ये लक्षणे दिसत नाहीत. विशेषतः आकडेवारीनुसार कोरोनाची लागण झालेले केवळ 10 टक्के लोकच रूग्णालयात दाखल होतात. यातील 100 पैकी दोघांना व्हेंटिलेटरची गरज भासते. तर व्हेंटिलेटरवर असणारे 80 टक्के कोरोना रूग्ण दगावत असल्याचे समोर आले आहे.

कुठल्याही प्रकारच्या अशा संसर्गजन्य आजारांपासून वाचण्यासाठी प्रत्येकाने आरोग्य जीवनशैलीत बदल करणे गरजेचं आहे. यात शारीरिक स्वच्छता, नियमित मास्क परिधान करणे, हात धुवणे गरजेचं आहे. जेणेकरून भविष्यात पुन्हा कधी अशाप्रकारची परिस्थिती उद्भवल्यास आपल्याला एकजुटीने याचा सामना करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here