पालघर – योगेश चांदेकर :
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पालघर यांच्या वतीने पक्षाच्या २१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘मर्दानी महाराष्ट्राची’ हा उपक्रम राबविण्यात आला. पालघर जिल्ह्यातील अनेक महिला कोरोना योद्ध्यांना ‘मर्दानी महाराष्ट्राची’ हे सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत हा उपक्रम हाती घेण्यात आला होता, महिला लोक प्रतिनिधी यांच्यासह राष्ट्रवादी महिला तालुका कार्यकारणी सदस्यांनी त्या त्या तालुकास्तरावर कोरोना योध्यांचा सन्मान केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांची प्रेरणा, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील डाॅक्टर, पोलिस, सफाई कामगार अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, समाज सेविका, आरोग्यसेविका (ANM) व प्राथमिक शिक्षिका अशा विविध ठिकाणी काम करण्याऱ्या महिलांचा सत्कार करण्याचा संकल्प खा. सुप्रिया सुळे आणि महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. खरे तर या सर्व महिलांचे कार्य खूप मोठे आहे पण सत्कारातून त्यांना स्फूर्ती मिळावी व त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मनापासून इच्छा आहे.

कासा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सिध्दवा जायभाये यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पालघर जिल्हाध्यक्ष किर्ती मेहता, डहाणू पंचायत समिती सभापती स्नेहलता सातवी, जिल्हा परिषद सदस्या जयश्री केणी, पंचायत समिती सदस्या स्वाती राऊत, नगरसेविका कविता बारी, माजी नगरसेविका रेणूका राकामुथा, नगरसेविका हिंदवी पाटील, नगरसेविका कविता माच्छी, डहाणू उपशहर अध्यक्षा रेखा माळी यांच्यासह इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. महिलांनी ग्रामीण व आदिवासी भागात कोरोना रोगप्रसार काळात केलेल्या कामाची पक्षाने दखल घेतल्याबद्दल जिल्हा निरीक्षक सुनीता देशमुख यांनी पक्षाचे आभार मानले.