पालघर – योगेश चांदेकर:
IAS ,IPS, IRS, IFS या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विविध राज्यांतील हजारो विद्यार्थी सध्या दिल्लीमध्ये राहत आहेत. महाराष्ट्रातील जवळजवळ २००० विद्यार्थी सध्या ओल्ड राजिंदर नगर, नवी दिल्ली या भागात वास्तव्यास आहेत. यापैकी अनेकजण हे भाड्याच्या खोल्यांमध्ये तर काहीजण हॉस्टेलमध्ये राहत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्यांना शक्य आहे अशांनी आपापल्या रुममध्येच जेवण बनवण्यास सुरुवात केली. मात्र ज्यांच्याकडे स्वयंपाक बनवण्यासाठी पुरेशी साधने नाहीत अशा विद्यार्थ्यांसमोर खानावळ बंद झाल्याने मोठे संकट निर्माण झाले होते.
अशावेळी मूळचा पालघर जिल्ह्यातील मात्र सध्या स्पर्धा परीक्षा तयारीसाठी नवी दिल्ली येथे असणारा ‘मिशन अन्नपूर्णा’ सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष मुक्तेश डफरिया व सौम्या हेमंत मिश्रा (कोषाध्यक्ष) हे दोघे या अडचणीतील विद्यार्थी मित्रांच्या मदतीला धावून आले आहेत. खानावळ बंद झाल्याने अडचणीत आलेल्या ओल्ड राजिंदर नगर या भागातील विद्यार्थ्यांशी संपर्क साधला व कम्युनिटी किचन सुरु करण्याचा निर्णय घेतला. संस्थेच्या माध्यमातून गेले काही दिवस तो १५० ते २०० विद्यार्थ्यांना रोज दोन वेळचे जेवण देत होते. मात्र उपलब्ध धान्याचा साठा संपल्यानंतर पुढे काय हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता.

धान्यसाठा संपत आला आहे हे लक्षात आल्याने मुक्तेशने नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची विनंती केली. यावर तातडीने यंत्रणा लावत एकनाथ शिंदे यांनी केवळ ३० मिनिटांमध्ये २०० जणांना एक महिना पुरेल इतका धान्यसाठा पाठवून दिल्याने सर्वच जण अवाक झाले. एवढंच नाही तर स्वतः फोन करून धान्यसाठा पोहोचला कि नाही याची ना. शिंदे यांनी खात्री केली. तसेच इतर काही अडचण असल्यास बिनदिक्कत संपर्क साधण्यास सांगितले.
दरम्यान पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात गरीब असहाय्य व्यक्ती भुकेल्या पोटी राहू नये यासाठी ‘मिशन अन्नपूर्णा’ या सेवाभावी संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेद्वारे पालघर जिल्ह्यातील शेकडो गरीब असहाय्य्य लोकांना मोफत पौष्टिक जेवण देण्यास सुरुवात केली होती. २०१८ पासून पालघर जिल्ह्यात मिशन अन्नपुर्णाचा प्रवास अविरतपणे सुरु आहे.
“दिल्लीतील त्या विद्यार्थ्यांबाबत कळाल्यानंतर तातडीने त्यांना शक्य ती मदत पोहोचवणे ही माझी जबाबदारीच आहे. तसेच कोरोनामुळे शिक्षणासाठी गेलेले अनेक विद्यार्थी इतर राज्यांमध्येही अडकलेले आहेत. माझी सर्वांना विनंती आहे कि त्यांनी कोरोनाचं संकट तळेपर्यंत जिथे आहेत तिथेच सुरक्षित राहावे. काहीही मदत लागल्यास थेट संपर्क साधावा.” – एकनाथ शिंदे, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री