मुंबई : योगेश चांदेकर – 
आपल्या अपत्याच्या मार्गात कोणतंही संकट आलं तरी आई त्या संकटाशी दोन हात करते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात असलेल्या एका लहानश्या गावात राहणारा आराध्य सरोदे (6) आणि हिंगोलीमध्ये राहणारी मयुरी ढेंबरे (9) या दोघांना यकृताचा कर्करोग असल्याचं निदान झालं होतं. जन्मतःच या दोघांनाही यकृताची समस्या होती. परंतु, योग्य निदान होऊ न शकल्याने आजार वाढल्याने दोघांनाही कर्करोगाची लागण झाली होती.
वैद्यकीय भाषेत याला हेपाटोब्लास्टोमा (बालपणातील एक अत्यंत दुर्मिळ यकृत कर्करोग) असे म्हणतात. या आजारामुळे दोन्ही मुलांचे यकृत निकामी झाले होते. या मुलांचे प्राण वाचवण्यासाठी यकृत प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नव्हता. मात्र, दोघांसाठी त्यांची आई पुढे आली. या मातांनी यकृत दान करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, देशभरात लॉकडाऊन असल्याने शस्त्रक्रियाही रखडल्या होत्या. पण अशा स्थितीत मुलांचा जीव वाचवणे गरजेचं असल्याने डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपणाचे आव्हान स्विकारले.

परळ येथील ग्लोबल रूग्णालयातील यकृत प्रत्यारोपण सर्जन डॉ. रवी मोहंका आणि डॉ. अनुराग श्रीमल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या चमूने ही शस्त्रक्रिया केली. यासंदर्भात बोलताना ग्लोबल रूग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. विभोर बोरकर म्हणाले की, ‘‘या रूग्णांना १० वेळा केमोथेरपी देणे गरजेचं असतं. परंतु, बऱ्याचदा सातव्या किंवा आठव्या केमोथेरपीच्या सायकलनंतर रूग्णांची स्थिती पाहून यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. परंतु, या दोघांच्याबाबतीत लॉकडाऊन असल्याने मार्चमधील शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागली होती. मात्र, किमोथेरपी सुरू ठेवण्यात आली होती. अखेरीस मुलांची प्रकृती पाहून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला’’. मुंबईतील ग्लोबल रूग्णालयातील यकृत प्रत्यारोपण सर्जन डॉ. रवि मोहंका म्हणाले की, ‘‘शस्त्रक्रिया करण्यापूर्वी या दोन्ही मुलांची कोविड-१९ चाचणी करण्यात आली होती. हा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं. दोन्ही मुलांच्या आईने यकृतदान करण्याची इच्छा व्यक्त केल्यानं शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु, मयुरीची आईचा (आशा ढेंबरे) यांचा रक्तगट जुळत नसल्याने त्यांना एक विशिष्ट इंजेक्शन देण्यात आले होते. त्यानंतर १ मे रोजी तिच्यावर यकृत प्रत्यारोपण पार पडले. याशिवाय २० मे रोजी आराध्याच्या आईने यकृताचा भाग दान केल्यावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली’’.

लहान मुलांवर यकृत प्रत्यारोपण करणारे सर्जन डॉ. अनुराग श्रीमल म्हणाले की, ‘‘लहान मुलांवर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे हे अवघड आणि गुतांगुतीचे काम आहे. परंतु, डॉक्टरांनी हे आव्हान यशस्वीरित्या पेलले आहे. या रूग्णांना शस्त्रक्रियेनंतर २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले होते. परंतु, आता दोघांचीही प्रकृती उत्तम असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.’’ ग्लोबल रूग्णालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी (मुंबई) डॉ. विवेक तलैळीकर म्हणाले की, ‘‘देशभरातील लॉकडाऊनमुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतु, रूग्णाची प्रकृती पाहून पहिल्यांदा जीव वाचवणे गरजेचं आहे. या अनुषंगाने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेमुळे दोन्ही मुलांना नव्याने जीवनदान मिळाले आहे.’’

मयुरीचे वडील यशवंत ढेंबरे म्हणाले की, ‘‘मुलीला यकृताचा कर्करोग असल्याचं निदान झाल्यावर आपल्या पायाखालची जमिनच सरकली होती. या आजाराबद्दल काहीच माहिती नव्हतं. पण मुलीला वाचवणे गरजेचं असल्याने तिला मुंबईला घेऊन आलो. याठिकाणी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगितले. परंतु, शस्त्रक्रियेसाठी लाखो रूपये खर्च येणार होता. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने तिच्या यकृत प्रत्यारोपणासाठी आम्हाला मोठी रक्कम गोळा करणे शक्य नव्हते. परंतु, रूग्णालयातील डॉक्टरांच्या मदतीमुळे आणि प्रयत्नांमुळे शस्त्रक्रियेसाठी लागणारे पैसेही जमा झाले आणि माझ्या मुलीला नवीन आयुष्य मिळाले.’’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here