पालघर : वीज बिलाबाबत खासदार गावित यांनी महावितरणला दिल्या ‘या’ सूचना..!

0
496

पालघर – योगेश चांदेकर :
“महावितरण कंपनीने एप्रिल-मे-जुन २०२० चे वीजबिल एकत्र दिले आहे, ते खुप मोठे आहे, लॉकडाउन मुळे रोजगार बुडालेला आहे, सर्व उद्योग बंद होते, पगार नाही, नोकऱ्या सुटलेल्या आहेत अशा वेळेस एकदम तीन महिन्यांचे वीज बिल भरणे शक्य नाही, त्यामुळे त्याचे हप्ते पाडुन द्यावे व हप्त्यास व्याज आकारू नये” अशा सुचना खासदार राजेंद्र गावित यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक नागरिकांच्या मधून उमटणारा सूर व त्यांची अडचण लक्षात घेऊन गावित यांनी केलेल्या या मागणीमुळे सामान्य नागरीकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. अद्याप महावितरण कडून या मागणी बाबत कोणतेही उत्तर मिळालेले नाही, असे असले तरी जनभावनेचा विचार करता असा तोडगा काढणे गरजेचे आहे.

दरम्यान पालघर येथे सर्व व्यापारी असोसिएशन व वीज ग्राहकांनी खासदार गावीत यांच्याकडे वीज बिलाबाबत तक्रार केली असता तोडगा काढण्यासाठी त्यांनी महावितरण आधिकारी, व्यापारी प्रतिनिधी व वीज ग्राहकांची संयुक्तिक बैठक आयोजीत केली होती. लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी केलेल्या वीजवापराचे प्रत्यक्ष रिडींग घेतल्यानंतर संगणकीकृत बिलिंग प्रणालीद्वारे एप्रिल, मे महिन्यासह जूनचे देण्यात आलेले तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल स्लॅब बेनिफीटसह योग्य व अचूक आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकाराचा अतिरिक्त भुर्दंड लावण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्राहकांनी वीजबिलांबाबत कोणताही संभ्रमता बाळगू नये असे पालघर महावितरणच्या अधिक्षक अभियंता किरण नागावकर यांनी यावेळी सांगितले.

वीजग्राहकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत सरासरी वीजबिलांचा भरणा केला असल्यास जूनमधील तीन महिन्यांच्या एकत्रित वीजबिलामध्ये एप्रिल व मे महिन्यांचा स्थिर आकार व विद्युत शुल्क वगळता उर्वरित रक्कम समायोजित करण्यात येत आहे. यासंबंधीची माहिती ग्राहकांसाठी वीजबिलामध्ये नमूद करण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये ग्राहकांना हिवाळ्यातील वीजवापराप्रमाणे सरासरी देयके पाठविण्यात आली होती. मात्र ऐन उन्हाळ्यात लॉकडाऊनमध्ये वाढलेला प्रत्यक्ष वीजवापर व दि. १ एप्रिल २०२० पासून लागू झालेले नवीन वीजदर यामुळे एप्रिल, मे व जून महिन्यांचे मासिक परंतु एकत्रित दिलेले वीजबिल अधिक युनिटचे व रकमेचे असण्याची शक्यता आहे. वीज बिल दुरुस्त करण्यासाठी महावितरण कार्यालयात गर्दी होत आहे, म्हणून महावितरण कंपनीने संपूर्ण पालघर जिल्ह्यात वीज बिल दुरुस्त करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात जास्तीची केंद्र सुरु करावी तसेच वीज बिल भरले नाहीत म्हणून ग्राहकांची विज जोडणी तोडु नये अशा सुचना खासदार गावित यांनी दिल्या आहेत.

या बैठकीला महावितरण कंपनीचे एक्झेक्युटिव्ह इंजिनिअर पालघर डिव्हिजनचे प्रताप माचीये, शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक केदार काळे, सर्व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष व पदाधिकारी, समाज सेवक यांच्यासह महावितरणचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here