पालघर: ‘त्या’ शिक्षकांना दोन दिवसांत पगार मिळणार – मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती; मुंबई ई न्यूजच्या पाठपुराव्याला यश

0
784

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर शिक्षण विभागातील ६५०० शालार्थ शिक्षक गेल्या महिन्याच्या पगाराच्या प्रतीक्षेत असल्याची बातमी मुंबई ई न्यूजने शनिवारी प्रसिद्ध केली होती. त्याची तात्काळ दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी महेंद्र वारभुवन यांनी त्या शालार्थ शिक्षकांचे पगार दोन दिवसांमध्ये अदा करण्यासंबंधी वित्त विभागाला सूचना केल्या आहेत. तसेच वेतन प्रणाली सॉफ्टवेअर डेटामध्ये कुणी छेडछाड केली आहे का याचा देखील शोध घेऊन दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, पालघर जिल्ह्यातील काही शिक्षक हे नियुक्तीच्या ठिकाणी काम न करता जिल्ह्याच्या कामासाठी कार्यरत असल्याची बातमी मुंबई ई न्यूजने प्रसिद्ध केली होती. त्यावेळी
महेंद्र वारभुवन यांनी तात्काळ दखल घेत त्या शिक्षकांना नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश दिले. मात्र जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग यांनी आजवर शिक्षकांच्या पगारांविषयीचे महत्वपूर्ण काम अध्यापनासाठी नेमणूक असणाऱ्या शिक्षकावर सोपविले होते. त्यामुळे वारभुवन यांनी आदेश दिल्यानंतर, ते शिक्षक नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झाले. त्यानंतर जवळपास ६५०० शालार्थ शिक्षकांचे पगार तांत्रिक अडचणीमुळे खोळंबले होते. तसेच तीन-तीन वेळा पगारपत्रक भरल्यानंतर देखील पगार झाला नसल्याने हा डेटा कोणी डिलीट केला का? असा संशय काही शिक्षकांनी व्यक्त केला होता.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याचे पगार मिळाला नसल्याने संकटात आलेल्या शिक्षकांनी मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांना संपर्क करत आपली व्यथा सांगितली होती. आज दोन दिवसात पगार मिळणार हे वृत्त समजताच त्यांनी मुंबई ई न्यूजचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here