पालघर – योगेश चांदेकर:
पालघर ग्रामीण मधील शिवसैनिक सध्या जिल्हाप्रमुख राजेश शहा यांच्याविरोधात आक्रमक झाले असल्याची बातमी मुंबई ई न्यूज ने १९ जुलै रोजी प्रसिध्द केली होती. यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जिल्हाप्रमुखांच्या अकार्यक्षमतेविषयी असणारी तीव्र नाराजी, बालेकिल्ल्यातच होणारी सेनेची पीछेहाट या सत्य परिस्थितीचा उहापोह करण्यात आला होता. मूंबई ई न्यूजने प्रसिध्द केलेल्या या बातमीसंदर्भात अधिक विश्वसनीय माहिती मिळावी आणि सत्यता पडताळणीसाठी २० जुलै रोजी एक पोल घेतला. या पोलला तब्बल १० हजारांच्यावर लोकांनी वोट दिले. यातून मुंबई ई न्यूजने मांडलेली नाराजीनाट्याची बातमी साधार आणि विश्वसार्ह असल्याचे स्पष्ट झाले. मात्र जिल्हाप्रमुख बदलावरून राजकीय घमासान सुरू असताना सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीच शिवसैनिकांमधून आलेल्या जनमताला खोटे ठरविण्याचा विडा उचलला आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या शिकवणीचा विसर?
सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करणारे समाजकंटक असल्याचा दावा या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या दिमाखात केला खरा मात्र हे सर्व करत असताना ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिकवण विसरले तर नाहीत ना? अशी शंका निर्माण होते. शिवसैनिक हे शिवसेनेतील सर्वात मोठं पद आसल्याचे बाळासाहेबांनी अनेक सभांमधून बोलताना सांगितल होत. शिवसैनिकांच्या बुलंद आवाजावर आणि जोरावरच शिवसेना उभी राहिल्याचे ते सांगत असत. मात्र पालघर मधील शिवसैनिकांनी उस्फुर्त भावना प्रकट करत सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्याने ते समाजकंटक कसे हा प्रश्न उपस्थित होतोय.
लोकशाहीचा चौथा स्तंभ समाजकंटक कसा?
आता विषय उरतो कि असा पोल तयार करणाऱ्या आणि शिवसैनिकांच्या मनातील उस्फुर्त भावना आपल्या लेखणीतून मांडणाऱ्या पत्रकारास तर पदाधिकारी समाजकंटक म्हणत नाहीत ना? जर ते असे करत असतील तर पुन्हा ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या विचारापासून फारकत घेत असल्याचे दिसून येते. पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांना संपर्क साधत मांडलेली भूमिका योग्य असल्याचं सांगत शिवसैनिकांच्या मनातील खदखद मांडण्यासाठी व्यासपीठ दिल्याबद्दल आभार मानले. असे असताना पदाधिकाऱ्यांना नेमकं समाजकंटक कुणाला म्हणायचं आहे असा प्रश्न उरतोच…