पालघर: मुंबई ई न्यूजचे ते वृत्त ठरले खरे; ग्रामविकास अधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटीस..!

0
439

पालघर – योगेश चांदेकर:

कोरोनाच्या विरुद्ध लढाईत सुरक्षित सोशल डिस्टन्स सोबतच फेस मास्क, हॅन्ड सॅनिटायझर, फेस शिल्ड, हॅन्ड ग्लोव्ह्ज, पिपीई किट, एन ९५ मास्क हि प्रमुख साधने आहेत असे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर करत याचा वापर करण्याचे सांगितले. केंद्र सरकारने देखील या गोष्टीचे गांभीर्य ओळखत संभाव्य चढ्या दराने होऊ शकणारी विक्री लक्षात घेत मार्चच्या पहिल्याच आठवड्यात या वस्तूंचे दर निर्धारित केले होते.

शासनाने असे दर निश्चित केले असले तरी पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायत मार्फत ग्रामस्थांना वाटण्यासाठी मागविण्यात आलेल्या 50 रुपये MRP असणाऱ्या हँड सॅनिटायझर बॉटलवर चक्क 190 रुपये MRP चे स्टिकर लावण्यात आले होते. हा साठा जप्त करून कारवाई करणे अपेक्षित असताना अशी कोणतीही कारवाई केली नाही, उलट कासा ग्रामविकास अधिकारी मोहन पाचलकर यांनी हा साठा पुरवठादारास तसाच परत केला. या संपूर्ण प्रकरणात पुरवठादार ते ग्रामपंचायत यंत्रणा यांची भूमिकाच संशयास्पद असल्याने यासंदर्भातील बातमी मुंबई ई न्यूजने प्रसिद्ध केली होती. मुंबई ई न्यूजच्या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने या प्रकरणातील जबाबदार ग्रामविकास अधिकारी पाचलकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

सदर पुरवठादाराने जास्तीच्या एमआरपी चे स्टिकर लावलेला माल मिळाल्यानंतर पाचलकर यांनी स्वतः तात्काळ तक्रार दाखल करून हा साठा सील करणे अपेक्षित होते. परंतु पाचलकर यांनी तो साठा परस्पर पुरवठादारास घेऊन जाण्यास सहकार्य केल्याचे दिसून आले. पाचलकर यांनी वेळीच तक्रार दाखल केली असती तर अशाप्रकारचे मोठे रॅकेट उघडकीस येऊ शकले असते. सध्या पालघर जिल्हा हा कोरोनाच्या बाबतीत रेड झोन मध्ये आहे. सुरुवातीच्या काळातच लोकांना सुरळीतरीत्या सॅनिटायझर उपलब्ध झाले असते तर संक्रमणाचा धोका आताच्या इतका वाढला नसता. त्यामुळे अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here