पालघर – योगेश चांदेकर :
जिल्हा परिषद उपाध्यक्ष व शिक्षण सभापती निलेश सांबरे यांनी आपल्याच विभागातील विविध प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी १ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या अत्यारीत येणाऱ्या शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नासाठी वारंवार पाठपुरावा करून देखील कार्यवाही होत नसल्याने त्यांनी उपोषण करणार असल्याचे सांगितले. तत्पूर्वी प्रशासनाने ३० जून पूर्वी गांभीर्य पूर्वक लक्ष देऊन हे प्रश्न मार्गी लावावे अशी मागणी त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन यांना निवेदन देत केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्त वेतन मंजूर करणे, कर्मचाऱ्यांचे सुधारित पीपीओ निर्धारित करणे, चटोपाध्याय निवृत्त कर्मचारी पेन्शन, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख पदोन्नती, मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार वस्ती शाळा शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी. यासह अनेक मागण्यांबाबत सांबरे यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून २२ पेक्षा जास्त वेळा पाठपुरावा करून देखील हेतू परस्पर रित्या प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर केला आहे.

त्याच प्रमाणे दिनांक 24 एप्रिल 2020 रोजी शिक्षण समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या ठरावाची कृती करण्या अगोदर म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी पालघर यांना दाखवून चर्चा करून नंतर कार्यवाही करा अशी समज आपण शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना दिल्याने सदर होऊन सभेतील एकही नसती आपणाकडून अभिप्राय आजपर्यंत शिक्षण विभागाकडे आलेल्या नाहीत. शेष फंड व नर्सरी शाळा यांचे वेतन अथवा मानधन याबाबतही अनेक महिने कोणत्याही प्रकारची कारवाई का होत नाही? गेल्या पाच वर्षातील अनेक चौकशीचे निर्णय लागूनही त्यावरही ठोस कारवाई का होत नाही? जिल्हा परिषदेच्या बैठका आयोजित करणेबाबत संभ्रमावस्था का आहे? तसेच शिक्षण समितीच्या नसती थांबेना बद्दल आपला उद्देश काय? शिक्षण समितीने एकमताने मंजूर केलेला ठराव आपणास रद्द करण्याचा अधिकार आहे काय? जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांना विविध प्रश्‍नांबाबत जिल्हा परिषदेमध्ये बैठक घेण्याचा अधिकार आहे किंवा नाही? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सदर निवेदनाच्या प्रती सांबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विविध सचिव,  कोकण भवन आयुक्त  जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक पालघर यांना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

“संस्थाचालकांना परस्पर फोन करून त्यांना खोटी माहिती देणारया आणि शिक्षकांची पिळवणूक करणाऱ्या पालघर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रभारी अधिक्षक दिलीप ऊबाळे यांना माध्यमिक विभागातून त्वरित हटवावे अशी मागणी शिक्षकांकडून केली जात आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे वरिष्ठ सहाय्यक म्हणून अस्थापना असताना त्या विभागाचे काम न करता माध्यमिक विभागाचे प्रभारी अधिक्षक काम करणारे दिलीप ऊबाळे हे संस्थाचालकांना परस्पर भेटणे, फोन करून त्यांना चुकीची माहिती देत असून मोठ्या प्रमाणात शिक्षकांकडून लक्ष्मी दर्शन घेत असून त्यांच्यामुळे संस्थाचालक व शिक्षक हैराण झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी आमदार अॅड निरंजन डावखरे व माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी सुद्धा ऊबाळे यांना माध्यमिक विभागातून त्वरीत हटवले नाही तर उपोषण केले जाईल असा इशारा दिला होता. मात्र उबाळे हे अजूनही माध्यमिक विभागातच कार्यरत आहेत, त्यांना त्वरीत माध्यमिक विभागातून हटवावे.” – निलेश सांबरे ( जि. प. उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण विभाग पालघर) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here