डहाणू प्रतिनिधी – विनायक पवार:
डहाणू तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वेती/वरोती ग्रामविकास अधिकारी प्रमोद भोईर यांनी पेसाच्या निधीत भ्रष्टाचार केल्याची तक्रार विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली होती. विद्यमान ग्रा. पं. सदस्य सदस्य दीपक घाटाळ यांनी भोईर यांची खातेनिहाय चौकशी करत कारवाईची मागणी गटविकास आधिकारी बाबासाहेब भरक्षे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. याला महिन्याभराचा कालावधी उलटून गेला तरी याप्रकरणाची चौकशी केली जात नसल्याने भोईर यांना पाठीशी घालण्याचा प्रकार तर होत नाही ना अशी शंका निर्माण होत आहे.
सविस्तर बातमी अशी कि, ग्रामपंचायत वेती/वरोती अंतर्गत येणाऱ्या कोद्यापाड्यात मारण्यात आलेल्या बोरवेलचे बिल प्रत्यक्ष 1,16,761 रुपये झालेले असताना भोईर यांनी बोरवेल ठेकेदाराला 1,30,000 रुपयेचा चेक दिला. जास्तीच्या दिलेल्या रकमेपैकी २४ हजार रुपये ग्रामविकास अधिकाऱ्यास दिल्याचे ठेकेदाराने कबूल केले आहे. याबाबत खुलासा मागितला असता “मी २४ हजार रुपये घेतले नसुन २० हजार रुपयेच घेतले आहेत व ते मी मुल्यांकन अंदाज पत्रक व ऑडीटसाठी पैसे देणार आहे” असे भोईर यांनी ग्रा. पं. सदस्य दीपक घाटाळ यांना सांगितले. एवढंच नाही तर “यापुढे कोण कसे काम करतो व कोणाचे कसे बिल निघते. मी स्वतःच्या खिशातुन पैसे भरुन येण्यावारी नाही आणि तुम्ही कायदयावर बोट ठेवुन चालु नका” असा दम भरून भोईर यांनी फोन ठेवल्याचा आरोप देखील ग्रामपंचायत सदस्य दीपक घाटाळ यांनी केला आहे.
दरम्यान मागील वर्षभरात एकही ग्रामसभा, मासिक सभा नियमाला धरून घेतली नाही. शासकीय योजना व लाभाची माहिती ग्रामस्थांना मिळत नाही. सर्व कामकाज मुख्यालयी न करता शहरातील स्वतःच्या घरातून करतात. या ठिकाणाहून खोटे दस्त करून केवळ कागदोपत्री ग्रामसभा व मासिक सभा दाखविली जाते. शासकीय योजनांमध्ये अपहार केला असून, याप्रकरणी खातेनिहाय चौकशी होणे आवश्यक असल्याचे निवेदनात पत्र देखील तंटामुक्ती अध्यक्ष अशोक भोईर यांनी नमूद केले आहे.व सबळ पुरव्याच्या प्रति जोडण्यात आल्या आहेत.
एक महिना उलटूनही या ग्रामविकास अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई नाही
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सबळ पुराव्यांसह तक्रार केली असून देखील अद्याप याप्रकरणी चौकशी वा कारवाई करण्याचे निर्देश दिलेले नाहीत. यामुळे साहजिकच ग्रामसेवकांचा गैरव्यवहार जोरात सुरू आहे असा आरोप ग्रा. पं. सदस्य भोईर यांनी केला आहे. तसेच जर एक महिन्याच्या आत कारवाई झाली नाही तर ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून टाळा ठोकण्याचा इशारा ग्रा. पं. सदस्य भोईर यांनी दिला आहे.