पालघर-योगेश चांदेकर :

पालघर- समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी एकत्र येऊन कोणताही भेदभाव नसेल अशी व्यवस्था उभी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी आदिवासी संस्कृती जगापुढे आणून त्याची जपणूक करण्याचे काम आदिवासी एकता परिषदेमार्फत होत असून मी माझ्या आदिवासी बांधवांना विविध संधी उपलब्ध करून देण्याचा निश्चित प्रयत्न करेन, असा विश्वास छत्तीसगडच्या राज्यपाल श्रीमती अनुसया उईके यांनी उपस्थित आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला.

27 व्या आदिवासी एकता परिषदेचे सांस्कृतिक महासंमेलन 13 ते 15 जानेवारी 2020 दरम्यान पालघर येथे आयोजित करण्यात आले आहे. या महासंमेलनात छत्तीसगडच्या राज्यपाल श्रीमती अनुसया उईके यांच्यासह मध्यप्रदेशचे मंत्री ओंकारसिंह मरकाम, पालघरचे खासदार राजेंद्र गावित, आमदार सर्वश्री श्रीनिवास वनगा, राजेश पाटील, सुनील भुसारा, आदिवासी एकता परिषदेचे संस्थापक काळूराम धोदडे, परिषदेचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे, विविध विभागांचे अधिकारी, विविध राज्यातून आलेले आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

महाराष्ट्रात राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने आदिवासींच्या कल्याणासाठी चांगले निर्णय घेतले असून पालघर जिल्ह्यामध्ये पेसा कायद्याची अंमलबजावणी, वनपट्टे वाटप आदींबाबत जिल्हा प्रशासनाने योग्य अंमलबजावणी करून आदिवासींना न्याय दिला आहे. याबद्दल श्रीमती उईके यांनी कौतुकोद्गार काढले. आदिवासींची जमीन हस्तांतरीत करण्यासाठी ग्रामसभेची संमती घेणे आवश्यक असल्याने यापुढे आदिवासींच्या हक्काला बाधा येणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here