आता रूग्णांना ऑनलाईन पद्धतीने मिळणार वैद्यकीय सल्ला

0
477

मुंबई – योगेश चांदेकर:
कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचेही आवाहन सरकारद्वारे वारंवार केले जात आहे. मात्र, वैद्यकीय आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास प्रवास करण्याची मुभा सुद्धा देण्यात आली आहे. परंतु, भितीमुळे अनेक जण वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांकडे जाणे सुद्धा टाळत असल्याचे दिसून येत आहेत. हे लक्षात घेऊन नागरिकांचा प्रवास टाळण्यासाठी मुंबईतील वोक्हार्ड रूग्णालयाने खास रूग्णांसाठी नवा उपक्रम सुरू केलाय. या उपक्रमाद्वारे आता सर्वसामान्य रूग्णांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला मिळणार आहे.

दरम्यान, किरकोळ आजार किंवा नियमित तपासणीसाठी डॉक्टरांकडे जाणे लोक टाळत आहेत. हे पाहून मुंबई सेंट्रल आणि मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयाने नवी योजना आखली आहे. याद्वारे मधुमेही, हृदयरोग, मूत्रपिंडाचा विकार किंवा अन्य आजारांच्या रूग्णांना रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभागात येण्याची गरज नाही. फक्त फोनद्वारे रूग्णांना डॉक्टरांशी संवाद साधता येणार आहे. या ऑनलाईन पद्धतीत डॉक्टर फक्त रूग्णाचा आजार जाणून घेऊन त्यावर काय उपचार केले पाहिजेत हा सल्ला देतील.
यासंदर्भात माहिती देताना वोक्हार्ड रूग्णालयाचे (केंद्र प्रमुख) डॉ. पराग रिंदानी म्हणाले की, कोरोना हे आरोग्याबाबचे प्रचंड मोठे आव्हान आहे. या आव्हानाचा सामना एकजुटीने करणे गरजेचं आहे. यासाठी एकमेकांपासून जमेल तितकं दूर राहणं आवश्यक आहे. तर या आजाराचा संसर्ग होण्यापासून टाळता येऊ शकतं. हे पाहून रूग्णांच्या हिताच्या दृष्टीने त्यांना रूग्णालयात उपचारासाठी न येता घरच्या घरी कशाप्रकारे वैद्यकीय उपचार दिले जाईल, याचा विचार केला. त्यानुसार आता रुग्णांना ऑनलाईन पद्धतीने डॉक्टरांचा घरबसल्या वैद्यकीय सल्ला देण्यात येणार आहे. यामुळे रूग्णांना उपचारासाठी रूग्णालयात येण्याची गरज नसून त्यांना घरीच आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातील.

ऑनलाईन वैद्यकीय सल्ल्यासाठी दुरध्वनी क्रमांक –
वोक्हार्ड रूग्णालय (मुंबई सेंट्रल) ०२२-६१७८४४४४
वोक्हार्ड रूग्णालय (मीरारोड) ०२२-४०५४३०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here