पालघर – योगेश चांदेकर :
पालघर जिल्ह्यातील पहिले विधी महाविद्यालय म्हणजे सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालय. विधी शिक्षण, सामाजिक न्याय, लोकसेवा, मोफत विधीसेवा मार्गदर्शन, तज्ज्ञांमार्फत विविध उपक्रम, क्षेत्र भेटी ईत्यादी महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन महाविद्यालय गेले तीन वर्षे करीत आहे.
या वर्षीही २ मार्च ते ७ मार्च २०२० दरम्यान सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयात “लिगसी फेस्ट २०२०” चे यशस्वी आयोजन करण्यात आले.

सदर उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव व प्रोत्साहन मिळावे हा या फेस्ट चा प्रमुख हेतू होता. त्या अनुषंगाने त्यांना आजच्या स्पर्धेच्या युगात पुढे जाण्यासाठी पाठबळ देणाऱ्या किंबहुना सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या स्पर्धांचा समावेश लिगसी फेस्ट मध्ये करण्यात आला होता.

अभिरूप न्यायालय स्पर्धा, अत्यंत संवेदनशील विषयावर वाद विवाद स्पर्धा,राज्यघटनेवर आधारीत प्रश्नमंजुषा स्पर्धा, सामाजिक विषयांवरील माहिती प्रभावीपणे मांडण्यासाठी पोस्टर मेकिंग स्पर्धा, बॅडमिंटन, कॅरम, टेबल टेनिस त्याचप्रमाणे मैदानी खेळ उदा.क्रिकेट ईत्यादी स्पर्धांचा समावेश होता.

या फेस्ट दरम्यान महाविद्यालयात अत्यंत महत्त्वाच्या
मोफत “विधी सहाय्यता केंद्र” म्हणजे फ्री लिगल एड क्लिनिकचे अनावरण करण्यात आले.
यावेळी सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी संस्थेचे अध्यक्ष अॅड. जी.डी.तिवारी, उपाध्यक्ष चंद्रकांत दांडेकर, सेक्रेटरी अशोक ठाकुर, जाॅईंट सेक्रेटरी जयंत दांडेकर तसेच संचालक मंडळातील सदस्य, सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किरण सावे, सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.पायल चोलेरा, पालघर न्यायालयातील अॅड.राजेश मोगरे, अॅड‌. नचिकेत तरडे व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.

यावेळी बोलताना विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणाल्या की सदर केंद्रामार्फत गरजुंना मोफत विधीसेवा मार्गदर्शन दिले जाईल. विधी विद्यार्थी व तज्ञ यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत मोफत विधी सेवा मार्गदर्शन उपक्रम पोहचवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

लिगसी फेस्ट २०२० ची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. आपण कितीही मोठे झालो तरी या मातीशी असलेले अतुट नाते हे आपल्या संस्कृतीतून प्रकट होते. म्हणूनच सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना, शिवाजी महाराजांवरील पोवाडा या सारख्या विशेष कार्यक्रमांनी झाली. त्याचप्रमाणे विविध समाजप्रबोधन नाटीका, पथनाट्यांचे सादरीकरण करण्यात आले. घरगुती हिंसा, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण यासारख्या विषयावरील परिसंवादातून सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सहभागी कलाकारांचे विविध लोकप्रिय गाण्यांचे उत्तम गायन आणि वादन हे या क्रार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. लिगसी फेस्ट २०२० चे यशस्वी आयोजन हे विधी विद्यार्थ्यांनीच केले हे विशेष. विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.पायल चोलेरा, प्रो.दिशा तिवारी, प्रो.उत्कर्षा जुन्नरकर, प्रो.राधा मित्रा, प्रो.विनोद गुप्ता, प्रो.प्रियांका तांडेल आणि विधी महाविद्यालय कर्मचारी वृंद यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here