पालघर: रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकरी लुबाडणूक प्रकरण; आरोप ते फरार आरोपी आढावा

0
369

पालघर – योगेश चांदेकर:

रिलायन्स इथेन गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांना दमदाटी करून नुकसान भरपाई पोटी मिळालेल्या मोबदल्यातील ३५ टक्के रक्कम जबरदस्तीने वसूल केल्याप्रकरणी गुन्ह्यात आत्तापर्यंत एकूण १० आरोपींची नावे समोर आली आहेत. यातील पाच आरोपींना सुनावण्यात आलेल्या पोलीस कोठडी व न्यायालयीन कोठडीस न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या गुन्ह्यात नव्याने नाव निश्चित करण्यात आलेले पाच आरोपी फरार आहेत.

शेतकऱ्यांचे फेसबुक लाईव्ह:

मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांना काही अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी याबाबत खुलासा करणार असल्याचे सांगत आपला आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्याची विनंती केली होती. चांदेकर यांनी मुंबई ई न्यूजच्या फेसबुक लाईव्ह द्वारे शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. यामध्ये शेतकऱ्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केल्याने जिल्ह्यात चर्चाना उधाण आले होते. यानंतर सोशल मीडियावर याबाबत प्रचंड राळ उडाली. एका आरोपीने थेट चांदेकर यांच्यावर मानहानी केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिली. मात्र विचलित न होता शेतकऱ्यांना त्यांची लुबाडणूक झाल्याची बाजू मांडण्यासाठी व्यासपीठ देत एका व्रतस्थ पत्रकाराचा धर्म पाळला. चांदेकर यांनी त्यांच्यावर होत असलेल्या जाणीवपूर्वक लक्ष केलं जात असताना आपल्या फेसबुक पोस्टद्वारे नम्रपणे उत्तर देत आरोपींसह(शेतकऱ्यांनी लुबाडणूकीचे आरोप केले असले कारणाने आरोपी असा उल्लेख केला आहे) सर्वांनाच या प्रकरणातील सत्य बाहेर यावे यासाठी उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्याचे आवाहन केले होते. “गरीब आदिवासी बांधवांची जर कुणी फसवणूक केली असेल तर त्यांस कठोर शासन व्हावे हि भूमिका घेण्यात गैर काय?” असा अनुत्तरित सवाल त्यांनी वाचकांसाठी सोडला.

अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचे प्रतिज्ञापत्र:

फेसबुक लाईव्ह द्वारे शेतकऱ्यांनी मांडलेल्या व्यथा पाहिल्यानंतर विक्रमगड तालुक्यातील विलशेत भागातील अन्यायग्रस्त शेतकरी निर्भीडपणे समोर आले. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई लाभातील 30 ते 35 टक्के रक्कम दलालांनी लाटल्याबाबत कार्यकारी दंडाधिकारी विक्रमगड यांच्या कार्यालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्राद्वारे मनोर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. गुन्हा दाखल न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी मुंबई ई न्यूजच्या माध्यमातून दिला होता.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पाठपुरावा:

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिज्ञापत्राचा दाखला देत पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याकडे याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपींवर कारवाईची विनंती केली. तसेच फडणवीस यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने त्यांनी खंत व्यक्त केली. याप्रश्नी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना कठोर शासन होण्यासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा करण्याचा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना मुंबई ई न्यूजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिला.

मनोर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद:

पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी मनोर पोलीस ठाण्यात आरोपी मधुकर सखाराम काकरा(रा. कोल्हाण), नारायण कान्हा डबके(रा. कोंडगाव), रुपेश पांडुरंग पाटील, दोषीराम कमळाकर घाटाळ, जानू रामा मोर यांच्यावर कलम ४२०,३८४,३८५,५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांनी शेतकऱ्यांना मिळालेल्या नुकसान भरपाईमधील ३५ टक्के रक्कम लुबाडल्याचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आला. मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा पालघर यांच्याकडे सोपविण्यात आला.

आर्थिक गुन्हे शाखेचा तपासात नवीन पाच आरोपींची नावे उघड:

पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा पालघर प्रशांत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, पोलीस उपनिरीक्षक प्रताप भोस हे याप्रकरणी तपास करत आहेत. याप्रकरणातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करत त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. याचं फलित म्हणजे आणखी काही शेतकऱ्यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपी निलेश गणपत पाटील, गणेश किसन आडगा, प्रकाश हरसन तांबडा, विनायक दामा कोदे, गोविंद जेठ्या हरपाले यांची नावे पोलीस तपासात उघड झाली आहेत. तसेच पोलीस रिमांडमध्ये अटकेतील आरोपी मधुकर काकरा याने आरोपी निलेश पाटील याच्याकडे ४० लाख रुपये दिल्याच्या नोंदींचे पुरावे मिळाले आहेत. आरोपी निलेश पाटील यास अटकेतील आरोपी नारायण कान्हा डबके याने २८ लाख रुपये दिल्याची देखील नोंद पोलीस रिमांड रिपोर्टमध्ये करण्यात आली आहे. नव्याने नाव आलेले पाचही आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना आवाहन, पोलीस अधिकारी यांची नावे संपर्क क्रमांक:
आर्थिक गुन्हे शाखा पालघर यांच्याकडून अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधण्याचे वारंवार आवाहन केले जात आहेत. याला अनेक शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे.

प्रशांत परदेशी, पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा पालघर – ८८८८८०८३२५
विकास नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी; पालघर – ८८०५८१३३५३
प्रताप भोस, पोलीस उपनिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, पालघर – ९९७५१२१२१२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here