पालघर-योगेश चांदेकर
पालघर- प्लास्टीक वापराच्या घातक परीणामाला भविष्यात आपल्याला सामोरे जावे लागु नये यासाठी राज्य शासनाने प्लास्टीक पिशवी, पर्यावरणाला हानी पोहोचविणारे प्लास्टीक यांच्यावर निर्बंध घातले आहेत. परंतू या निर्णयांची काही विक्रेते अंमलबजावणी करत नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या निदर्शनास आले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे शेतकरी बांधवांच्या कर्जमुक्ती साठी आधार प्रमाणीकरण जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांच्या उपस्थित करत असताना जिल्हाधिकारी यांच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ आणण्यात आला, डॉ.शिंदे यांची नजर त्या पुष्पगुच्छाला असलेल्या प्लास्टीकवर पडली.
पुष्पगुच्छ कुठून खरेदी करण्यात आला यांची माहिती जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी घेतली. आधार प्रमाणीकरण पुर्ण झाल्यावर स्वत: जिल्हाधिकारी डॉ. शिंदे हे प्लास्टीक विक्रेत्यावर कारवाई करण्यासाठी निघाले. नगर परिषदेच्या इमारतीत खालील गाळ्यांमध्ये प्लास्टीक विक्री तसेच ग्राहकांना प्लास्टीक पिशवीमध्ये दैनंदिन वस्तू देताना जिल्हाधिकारी यांनी स्वत: पाहिले. लगेचच नगरपरिषदेचे मुख्यधिकारी अरविंद माळी यांना बोलावून याबाबतीत जाब विचारणा केली परंतू श्री. माळी यांनी समाधान कारक उत्तर न दिल्याने जिल्हाधिकारी डॉ.शिंदे यांनी जे प्लास्टीक पिशवी मध्ये विक्री करतो त्यांच्यावर कारवाई करत प्रत्येका कडून 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
जिल्हाधिकारी डॉ.शिंदे यांच्या अचानक केलेल्या कारवाईमुळे प्लास्टीक पिशवी विक्रेत्यांनी यापुढे नियमाचे पालन करणार असे सांगितले. तसेच नागरिकांनी या अचानक केलेल्या कारवाई वर जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांचे आभार मानले.