पालघर – योगेश चांदेकर:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सकाळी 10 वाजता देशाला संबोधित करताना संपूर्ण देशातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यामुळे आपआपल्या घरी जाण्याची आस लावून बसलेल्या परराज्यातील मजुरांना मोदींनी जेथे आहेत तेथेच थांबण्याचं आवाहन केलं. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील तवा आश्रमशाळा येथे राजस्थान येथील १०२ व इतर ठिकाणचे ७ असे एकूण १०९ कामगार आहेत. काल सकाळपासून त्यातील ८९ जणांनी जेवण सोडले होते.
प्रशासकीय अधिकारी व स्थानिक अधिकाऱ्यांनी अनेकवेळा विनवण्या केल्यानंतर देखील कालपासून त्यांनी घराच्या ओढीमुळे जेवण सोडले होते. जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी व्यक्तिशः या सर्व विषयात लक्ष घालत “कोरोनाचे हे संपूर्ण जगावर आलेलं संकट असून आपण धीर धरायला हवा” असं त्यांना समजावलं. जिल्हाधिकारी कैलास शिंदे, सहाय्यक जिल्हाधिकारी सौरभ कटियार, तहसीलदार राहुल सारंग, मंडल अधिकारी समीर राणा, तलाठी संतोष मते, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंदराव काळे, आश्रमशाळा मुख्याध्यापक गजानन पाटील यांना अखेर त्यांची मनधरणी करण्यात यश मिळाले. आज (बुधवारी) दुपारी त्या कालपासून उपाशी असलेल्या सर्व मजुरांनी जेवण घेतलं आणि प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.

दरम्यान लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर वाहतूक व्यवस्था बंद झाल्यामुळे अनेक परराज्यातील मजूर हे पायीच मार्गस्थ झाले होते. त्या सर्वांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असेल त्या ठिकाणी थांबण्यास सांगून प्रत्येक जिल्हाप्रशासनाला परप्रांतीय मजुरांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील तवा आश्रमशाळा येथे राजस्थान येथील १०२ व इतर ठिकाणचे ७ असे एकूण १०९ कामगारांना ठेवण्यात आले होते.
- “लॉकडाऊन ३ तारखेपर्यंत वाढवण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक वगळता देशातील संपूर्ण वाहतूक बंद आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेल्या हजारो कामगारांनी ते ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी राहून प्रशासनाला सहकार्य करावे. या संकटाच्या काळात भावनिक न होता सर्वांनी धीर धरावा” – जिल्हाधिकारी कैलास शिंदे