पालघर: मेंढवन खैर वृक्षतोड प्रकरण; चौकशी अहवाल पूर्णपणे दिशाभूल करणारा..!

0
526

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर तालुक्यातील मौजे मेंढवन येथे कूप नंबर १९१ व २०७ मध्ये वनविकास महामंडळ यांच्याकडून ग्रामसभेचा ठराव न घेता सर्व नियम धाब्यावर बसवत मोठ्या प्रमाणात खैर प्रजातीच्या वृक्षांची कत्तल करण्यात आल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले होते. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश राम बाबू (व्यवस्थापकीय संचालक – वन विकास महामंडळ) व नरेश झुरमुरे (मुख्य वनसंरक्षक – ठाणे वनवृत्त) यांना दिले होते. याबाबतचा चौकशी अहवाल विभागीय व्यवस्थापक, वनप्रकल्प विभाग ठाणे यांनी दिला असून यात दिलेले स्पष्टीकरण हे पूर्णपणे दिशाभूल करणारे आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे बिस्तुर कुवरा सरपंच मेंढवन ग्रामदान मंडळ यांनी मुंबई ई न्यूजला बोलताना सांगितले.

खैर प्रजातीच्या वृक्षांची कत्तल प्रकरणी चौकशी अहवाल सादर करताना विभागीय व्यवस्थापक, वनप्रकल्प विभाग ठाणे यांनी खुलाशादाखल पूर्णपणे चुकीची माहिती दिली आहे. कक्ष क्रमांक २०७ हे ग्रामपंचायत मेंढवनच्या हद्दीत येत नसल्याची मांडणी केलेली आहे. तसेच कक्ष क्रमांक १९१ मधील कामासंबंधी तोंडी परवानगी दिल्याची तद्दन खोटी माहिती दिली आहे. तसेच सर्व प्रकार माहित असूनही विभागीय व्यवस्थापक FDCM ठाणे हे जाणीवपूर्वक खोट्या दस्ताऐवजाची मांडणी करून बनावट पुराव्यांच्या आधारे ते खरे असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न आहेत असा आरोप बिस्तुर कुवरा यांनी केला आहे.

विभागीय व्यवस्थापक अहवाल सादर करत असताना या प्रकरणात खोटी माहिती देऊन नेमकं कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत? यासंबंधीचा अहवाल त्यांनी कोणत्या माहितीच्या आधारे दिला? जीवाची बाजी लावून शोधपत्रकारिता करणाऱ्यांनी अशी माहिती समोर आणण्याला खोडसाळपणा कसे म्हणता येईल? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत ज्याची उत्तरे येत्या काळात संबंधित प्रशासनाला द्यावी लागणार आहेत.

  • “विभागीय व्यवस्थापक, वनप्रकल्प विभाग ठाणे यांनी खोट्या पुराव्यांच्या आधारे अहवाल दिला असून यात दिलेले स्पष्टीकरण हे पूर्णपणे दिशाभूल करणारे आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करणार आहे. त्यामुळे मेंढवन ग्रामदान मंडळाची परवानगी न घेता केलेली वृक्षतोड बेकायदेशीर आहे. याप्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करण्यात यावी व दोषींना कठोर शासन करण्यात यावे.” – बिस्तुर कुवरा, सरपंच मेंढवन ग्रामदान मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here