पालघर वासियांनो सावधान; तुमच्यामुळे माकडांना कोरोना संसर्ग झाल्यास अनर्थ होईल..!

0
373

पालघर – योगेश चांदेकर:

सोनोपंत दांडेकर महाविद्यालय येथील प्राणी शास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक भूषण भोईर यांनी वाघोबा खिंडीतील माकडांना कोरोना संसर्ग होऊ शकतो असा दावा करत पालघरवासियांना याबाबत खबरदारी घेण्याविषयी आवाहन केलं आहे. त्यांचा लेख सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

प्रा. भूषण भोईर यांचा लेख अगदी जसाच्या तसा:

मित्रांनो,
पालघर मधील वाघोबा खिंडीत वर्षभर माकडांना येणारे जाणारे प्रवासी गाड्या थांबवून, किंवा जाणून बुजून खाद्य आणून घालत असतात, तसे करणाऱ्यांना नेहमी असे वाटते की आम्ही या प्राण्यांवर परोपकार करत आहोत, परंतु त्यांची ही कृती परोपकार नसून वन्यजीवांसाठी प्राणघातकी ठरत आहे, माकडांना खाद्य घालताना त्यांच्या संपर्कात आल्यामुळे माणसांना असलेले लहान-मोठे आजार नेहमीच वन्य जीवन मध्ये पसरत आलेले आहेत, तसेच वन्यजीवांच्या संपर्कात आल्यामुळे देखील मानवजातीला खूप मोठ्या प्रमाणावर भयानक रोगांना सामोरे जावे लागले आहे. गेल्याच वर्षी केरळ येथे रस्ते रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर डोंगर आणि जंगल कापले गेले,परिणामी तेथे राहणाऱ्या वटवाघळांना जंगलात खाद्य कमी मिळू लागल्याने ती वटवाघळे शहरांमध्ये किंवा मानवी लोकवस्तीमध्ये शिरली आणि तेथील फळे त्यांनी खाल्ली आणि हीच फळे बाजारात आली आणि बाजारातून माणसाच्या शरीरात आणि तिथे राहणाऱ्या लोकांना नीपाह व्हायरस ची लागण झाली, त्याच प्रमाणे इबो ला हा व्हायरस देखील आफ्रिकेत वन्यजीवन मुळेच मानव वस्तीत आला तसेच आत्ता संपूर्ण जगभरात थैमान घालत असलेला कोरोनाव्हायरस हादेखील infected वटवाघुळ किंवा खवले मांजर यांचे मांसभक्षण केल्यामुळेच मानवी लोकवस्तीत आला आहे. वन्य प्राण्यांपासून मानव वस्तीत होणाऱ्या संसर्गजन्य प्रक्रियेस झूनोसिस असे म्हणतात.

वन्यप्राण्यांशी अशास्त्रीय पद्ध्तीने निकट संपर्क ठेवणे हे नेहमी आपल्यासाठी तसेच वन्यप्राण्यांसाठी अत्यंत जीवघेणे ठरू शकते, कोरोना संदर्भात अति उच्च दर्जाची काळजी घेऊन देखील न्यूयॉर्क येथील boronx zoo या प्राणीसंग्रहालयातील नादिया नावाच्या वाघिणीला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे अमेरिकन वृत्तपत्राने सांगितले. असे असताना जे वन्यप्राणी जगावे असे ज्या माणसांना वाटते आणि ज्यासाठी ते माकडांना खाद्य देण्यासाठी वाघोबा खिंडीत जातात तो हेतूच मुळात माकडांच्या जीवावर उठू शकतो. त्यामुळे या माकडांना त्यांच्या हिंमतीवर जंगलात मानवी हस्तक्षेपाशिवाय विहार करू द्या, प्रत्येक जीवाचे पोट कसे भरेल याची काळजी निसर्ग घेतच असतो, या माकडान साठी काही करायचे असे वाटत असल्यास बाराही महिने जंगलामध्ये विविध जातीची भारतीय वंशाची फळे देणाऱ्या वृक्षांची लागवड करा आणि त्या माकडांना आणि इतर वन्यजीवांना स्वावलंबी बनवा.

बऱ्याच अंशी वाघोबा येथे बटाटा वेफर्स चे पॅकेट, बिस्किटे इत्यादी. प्लास्टिक कचरा तेथे पडलेला असतो. हरीण भेकर यांच्यासारखे वन्य प्राणी उन्हाळ्यामध्ये, प्रसूतीच्या वेळी त्यांना अत्यावश्यक असणाऱ्या क्षारांच्या शोधात असतात. निसर्गतः हे क्षार दगडावर त्यांना मिळतात आणि ते दगड चाटून जीवनावश्यक खनिजे तेथून मिळवतात. आपण टाकलेल्या प्लास्टिकचा कचरा ज्यात मिठाचे अंश असतात त्या प्लास्टिकच्या पिशव्या हे वन्यप्राणी रात्रीच्या वेळेला तेथे येऊन खातात आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर हे प्लास्टिक पोटात गेल्यामुळे हरीण वर्गातले प्राणी मृत्युमुखी पडतात. अशा रीतीने आपल्याकडून वन्यप्राण्यांची हत्या होत आहे. भारतीय वन्यजीव कायद्याप्रमाणे वन्यप्राण्यांना खायला देणे हा कायद्याने गुन्हा आहे तरी ह्या वन्यप्राण्यांसाठी काही करायचे झाल्यास आपल्या गरजा कमी करा गाड्या, मोठमोठे सिमेंटचे बंगले, रस्ते, खनिजे इत्यादींसाठी आपण मोठ्या प्रमाणावर डोंगर फोडत आहोत त्यातील दगड गोटे, लाकडं, माती आणि इतर खनिज काढून आपणच जंगल संपवत आहोत आणि त्यात राहणाऱ्या कित्येक वन्यजीवांना कायमच बेघर करत आहोत. त्यामुळे आपल्या गरजा कमी करून जंगल कसे वाढेल आणि समृद्ध होईल याच्याकडे आपले लक्ष असायला हवे मुळात मानवाचा हस्तक्षेप च जर ह्या जंगलांमध्ये झालाच नाही तर जंगले अपोआप वाढू लागतात, त्यात लहान च्या मधमाशी पासून, नाचणाऱ्या बागडणाऱ्या मोरा पासून ते डरकाळी फोडणाऱ्या वाघापर्यंत जंगल बहरते आणि मुके असलेले जंगल बोलू लागते. त्या मुळे जंगलातला आपला हस्तक्षेप त्वरित थांबवा.

टीप: सदर लेखात केलेल्या विश्लेषणाशी अथवा लेखकाने केलेल्या दाव्यांशी मुंबई ई न्यूज बांधील नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here