पालघर: रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांना पोलीसांचे आवाहन..!

0
411

पालघर – योगेश चांदेकर:

संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलेल्या रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या पाच जणांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. पोलीस यंत्रणेने या प्रकरणात आणखी ज्या शेतकऱ्यांची लुबाडणूक झाली असल्यास तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर व सामाजिक कार्यकर्ते विजय वझे यांनी रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांची लुबाडणूक झाली असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आणल्यानंतर पोलीसांनी गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन तात्काळ कारवाई केली. याप्रकरणात पोलीसांनी पाच जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी, “हा गुन्हा शेतकऱ्यांशी संबधित असून तितकाच संवेदनशीलही आहे. त्यामुळे तक्रार झाल्यानंतर तात्काळ दखल घेऊन प्रकल्प बाधितांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस दल सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे. या गुन्ह्यात सामील असणाऱ्या सर्व गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा देण्यासाठी पोलीसदल पाठपुरावा करणार आहे” असे सांगितले होते. त्याच अनुषंगाने आता पोलीस प्रशासनाने या प्रकरणात आणखी काही शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याची शक्यता गृहीत धरून तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

पोलीसांनी केलेलं आवाहन:

तलासरी, विक्रमगड, डहाणु, वाडा या तालुक्‍यातील शेती रिलायन्स ईथेन गॅस पाईपलाईन करीता संपादित करण्यात आलेल्या शेतकरी बांधवाना जाहिर आवाहन!!

तलासरी, विक्रमगड, डहाणु, वाडा या तालुक्यातील शेतकरी यांच्या शेतजमिनी रिलायन्स गॅस पाईप लाईन लिमीटेडच्या माध्यमातुन टाकण्यात येत असलेल्या रिलायन्स ईथेन गॅस पाईपलाईन करीता संपादित करण्यात आल्या आहेत. त्या संपादित करण्यात आलेल्या जागेचा वाढीव मोबदला मिळण्याकामी विविध आंदोलने करण्यात आले होते. त्यानंतर पीडीत शेतकरी यांना वाढीव मोबदला मिळाला आहे. परंतु पिडीत शेतकरी यांची फसवणुक करुन त्यांना शिवीगाळ व दमदाटी करून प्राप्त असलेल्या वाढीव मोबदल्यातील ३५ टक्के रक्‍कम खंडणी स्वरूपात मागीतल्याबाबत मनोर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास आथीक गुन्हे शाखा, पालघर हे करीत आहेत तरी पालघर जिल्हयातील तलासरी, विक्रमगड, डहाणु, वाडा या तालुक्‍यातील शेतकरी यांना आवाहन करण्यात येते की, वरील प्रमाणे वाढीव मोबदल्यातील रक्कम आपणास दमदाटी शिवीगाळ करून खंडणी स्वरूपात कोणी मागीतली असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधुन आपल्या तक्रारी कळवाव्यात.

पोलीस अधिकारी यांची नावे संपर्क क्रमांक:
श्री. प्रशांत परदेशी, पोलीस उपअधीक्षक आर्थीक गुन्हे शाखा पालघर – ८८८८८०८३२५
श्री. विकास नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी; पालघर – ८८०५८१३३५३
श्री. प्रताप भोस, पोलीस उपनिरीक्षक, आर्थीक गुन्हे शाखा, पालघर – ९९७५१२१२१२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here