पालघर – योगेश चांदेकर:
डहाणू तालुक्यातील कासा गावात असणाऱ्या डाक घराची तसेच आदीवासी सेवा मंडळ कार्यालयाची प्रचंड दुरावस्था झाली आहे. बऱ्याच वर्षापासून डाक कार्यालयाच्या जुन्या इमारतीच्या पत्र्याच्या शेडचे चैनल पूर्णपणे गंजलेले असून ते कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहेत.

छताचे चैनल पूर्णपणे जीर्ण झाले असून कोसळू नये यासाठी त्यांस बांबूचा आधार देण्यात आला आहे. याठिकाणी कार्यरत कर्मचारी वर्ग अक्षरशः जीव मुठीत घेऊन काम करत आहे. याबरोबरच डाक कार्यालयामध्ये दिवसभर लोकांची ये-जा असते. त्यामुळे एखादा अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण राहणार? शासनस्तरावर याची दखल घेतली जाईल का? असा प्रश्न कर्मचाऱ्यांसह कासा येथील ग्रामस्थांना पडलेला आहे.
“डाक कार्यालयात कुठलीही दुर्दैवी दुर्घटना घडण्याअगोदर प्रशासनाने दखल घेत हे काम मार्गी लावावे. कर्मचाऱ्यांसह याठिकाणी कामासाठी आलेले अनेक लोक वावरत असतात त्यामुळे दुर्घटना झाल्यास होणारी संभाव्य हानी टाळण्यासाठी प्रशासनाने याकडे वेळेतच लक्ष द्यावे” – अंकित किणी, ग्रामस्थ