पालघर: रिलायन्स बाधित शेतकरी लुबाडणूक प्रकरणी ‘त्या’ आरोपीला अटक

0
403

मुंबई ई न्युज नेटवर्क:

रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकरी लुबाडणूक प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून फरार आरोपी कमलाकर शिंदे यास अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता अटकेतील आरोपींची संख्या ७ वर पोहोचली असून आरोपी निलेश पाटील सह इतर सात जण अद्याप फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच आरोपी कमलाकर शिंदे याचा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज पालघर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता. आज आरोपीस पालघर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले असता त्यास ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांना लुबाडल्याची घटना सर्वप्रथम सामाजिक कार्यकर्ते विजय वझे व मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांनी उघड केली. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यासाठी तसेच उच्चस्तरीय चौकशीद्वारे बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील पाठपुरावा केला. अखेर या लढ्याला यश आलं व गुन्हा दाखल करत पुढील तपासासाठी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखा पालघर यांच्याकडे वर्ग करण्यात आलं.

आरोपींना तात्काळ अटक करावी यासाठी उपोषणाचे अस्त्र

रिलायन्स पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांनी आपल्या विविध न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी ७ सप्टेंबर पासून पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या उपोषणात मुंबई ई न्युजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर, सामाजिक कार्यकर्ते विजय वझे यांच्यासह ८ बाधित शेतकरी सहभागी आहेत. तसेच जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी उपोषणाला सोशल डिस्टंसिंग आणि कोरोनाच्या पार्श्वभुमीवर काळजी घेत आपले जाहीर समर्थन दिले आहे.

आज उपोषणाचा पाचवा दिवस असून फरार आरोपींना अटक तसेच इतर मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही यावर उपोषणकर्ते ठाम आहेत. त्यामुळे फरार आरोपींना कधी अटक होते हे उपोषणकर्त्यांसाठी तसेच या प्रकरणाच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here