…शेतकऱ्यांना लुटणाऱ्या ‘त्या’ दलालांवर गुन्हे दाखल करा – देवेंद्र फडणवीस

0
410

पालघर – योगेश चांदेकर:

रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्प बाधित शेतकऱ्यांकडून काही दलालांनी मिळालेल्या मोबदल्यातील ३५ टक्के रक्कम लुबाडल्या प्रकरणी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना तात्काळ गुन्हा नोंदवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रकरणी विक्रमगड तालुक्यातील विलशेत येथील १५ हून अधिक पिडीत शेतकऱ्यांनी मनोर पोलीस ठाण्यात स्वयंस्पष्ट निवेदन दिले होते. त्याप्रकरणी अद्याप गुन्हा नोंद झालेला नसल्याचे नमूद करत विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी पोलीस अधीक्षकांना याप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

दलालांकडून वारंवार तक्रारदारांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याकडेही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधीक्षकांचे लक्ष वेधले आहे. गरीब आदिवासी शेतकऱ्यांवर अन्याय होत असून त्यांच्या झालेल्या लुबाडणुक प्रकरणी दलालांवर गुन्हे दाखल करण्याची विनंती त्यांनी केली आहे. दरम्यान मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांनी रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांची लुबाडणूक झाली असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आणल्याचा राग मनात धरून त्यांच्यासह विजय वझे यांच्याविरोधात कासा व मनोर पोलीस ठाण्यात मानहानीची फिर्याद दाखल करण्यात आली होती. असे असताना देखील न डगमगता याबाबत सातत्याने पाठपुरावा करत त्यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडत अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या ताकदीने लढा सुरू ठेवला होता.

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातच रिलायन्सने बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित गरीब आदिवासी शेतकऱ्यांच्या संघर्षाविषयीची सुरुवातीपासूनच माहिती असणाऱ्या फडणवीसांनी याप्रश्नी लक्ष घातल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे याप्रश्नी गुन्हे दाखल होणार का? तसेच यामध्ये कोण-कोणाचे आर्थिक हितसंबंध आहेत? या प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळात मिळणार असल्याने संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष याकडे लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here