पालघर : सॅनिटायझर प्रकरणात तारीख पे तारीख.. कारवाईच भिजत घोंगड..!

0
425

पालघर – योगेश चांदेकर :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना वाटप करण्यासाठी आणलेल्या सॅनिटायझरच्या घोटाळ्याला ३ महिने उलटूनही संबंधितांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात मुंबई ई न्यूज ने वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. याप्रश्नी खासदार राजेंद्र गावित यांनी ही चौकशीची मागणी केली होती. लोकप्रतिनिधींनी कारवाईची मागणी करून देखील या प्रकरणात कारवाई करण्यास सातत्याने टाळाटाळ होत असल्याने लोकप्रतिनिधींना प्रशासकीय यंत्रणा जुमानत नसल्याचे चित्र यामुळे स्पष्ट होत आहे.

सॅनिटायझर घोटाळ्यात भ्रष्ट व्यक्तींना इथल्या स्थानिक पुढाऱ्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यातच दिवसेंदिवस कोरोनाची स्थिती अधिक गंभीर होत असल्याने संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटायझर ही जिवनावश्यक वस्तू बनली आहे. परंतु ही जिवनावश्यक वस्तूच शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जवळपास तिप्पट दराने विकणारी टोळी कार्यरत आहे. त्याचा भांडाफोड मुंबई ई न्यूजने तीन महिन्यापूर्वीच केला असून यासंदर्भात कारवाईची मागणी कासा येथील गावकऱ्यांनी केली आहे. असे असले तरी अद्याप संबंधितावर कोणतीही कारवाई होत नसल्याने अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराला आणखी खतपाणी घातले जात असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

कासा ग्रामपंचायती तर्फे ग्रामस्थाना वाटण्यासाठी मागवलेली सॅनिटायझरची ५० रूपये विक्री किंमत असलेली बाटली तब्बल १९० रूपये विक्री किंमत दाखवून पुरवठा करण्यात आली होती. सध्या हे प्रकरण चौकशी अधिन असून याबाबतचा अहवाल मात्र बासनात गुंडाळ्याप्रमाणे ३ महिने उलटून देखील धूळ खात पडून आहे. याप्रकरणी कासा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मोहन पाचलकर आणि वितरक एजन्सी बालाजी एंटरप्रायझेस यांनी संगनमताने हे कृत्य केले असल्याची चर्चा आता संपूर्ण भागात सुरू आहे.

ग्रामविकास अधिकारी पाचलकर यांनी ५० रूपयांची विक्री किंमत असलेली बाटली १९० रूपयांच्या कोटेशनखाली घेतल्याचे स्पष्ट दिसत असल्याने यासंदर्भात त्यांना विचारणा केली असता बालाजी एंटरप्रायझेसला याचे बील अद्याप दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. असे असले तरी, पाचलकर यांनी जादा दराने आलेले सॅनिटायझर ताब्यात घेतल्यानंतर त्याचवेळी दरातील तफावत ध्यानात घेऊऩ अन्न व औषध प्रशासन विभागाला कळवणे आवश्यक होते. असे न करता संबंधित अधिकाऱ्यांनी वितरकालाच पाठिशी घालण्याचा प्रयत्न केल्याचे कासा गावातील लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची ताबडतोब चौकशी करून सॅनिटायझरच्या कथित भ्रष्टाचारातील आरोपींना पाठिशी न घालता कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थ करू लागले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here