पालघरच्या तरुणाची जर्मनीत वाहवाह

डॉ.सुमितचे यश पालघर नव्हे तर आपल्या देशाला अभिमान वाटेल असे आहे- विवेक पंडित

0
425

MUMBAI e NEWS –
पालघर-योगेश चांदेकर :

डहाणूतील उच्चशिक्षित आदिवासी तरुणाने मृद्‌ व जलसंधारण अभियांत्रिकी क्षेत्रात महत्त्वाचा संशोधनात्मक प्रबंध सादर केला आहे. त्यावर आधारित माहितीचे संकलन करून जर्मनीच्या लंबर्ट अकॅडमी पब्लिकेशनने पुस्तक प्रकाशित केले आहे. डॉ. सुमित ढाक असे या तरुणाचे नाव असून त्यांच्या या कार्याचा डंका आंतरराष्ट्रीय स्तरावर निनादल्याने त्यांचे कौतुक होत आहे. सुमित ढाक हे शेती अभ्यासासोबतच श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मार्गदर्शन आणि संघटन तसेच गरिबांच्या प्रश्नांवर संघटनात्मक काम करत आहेत.
तसेच गोखले एज्युकेशन ट्रस्ट या शिक्षण संस्थेत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले त्याच संस्थेत ते आज अध्यापनाचे काम करत आहेत. याबद्दल ते गोखले एज्युकेशन ट्रस्ट च्या सर्व अध्यापक आणि सर्व संबंधितांचे आभार व्यक्त करणे सुमित विसरत नाही.

डॉ. सुमित ढाक यांचे पहिले ते पाचवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वाकी येथील आश्रमशाळेत झाले. त्यानंतर त्यांचे माध्यमिक शिक्षण के. एल. पोंदा हायस्कूल डहाणू येथे झाले. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बोर्डी पी. जी. ज्युनियर कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले.
तेथे त्यांनी तालुक्‍यात आदिवासी समाजातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान पटकावला. त्यांनी चार वर्षांची कृषी अभियांत्रिकी पदवी डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली येथे पूर्ण केली. 2011 ला एम.टेक.ची पदवी मिळवून मृद्‌ आणि जलसंधारण अभियांत्रिकी महाराणा प्रताप महाविद्यालयात पूर्ण केले. एम.टेक. करताना त्यांना दोन वर्षांसाठी केंद्र सरकारकडून आयसीएआर-जेआरएफ अवॉर्ड फेलोशिपने सन्मानित करण्यात आले.

डॉ. ढाक यांनी मृद्‌ आणि जलसंधारण अभियांत्रिकी विषयात 2015 ला विद्यावाचस्पती (पीएच.डी.) प्राप्त केली. मुख्य प्राध्यापक प्रा. डॉ. एस. आर. भाकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी “मॉडेलिंग ऑफ मायक्रोक्‍लायमेट अँड रेफरन्स ईवॅपोट्रान्सपोरेशन इन पोलीहाऊस’ हा प्रकल्प वेळेत पूर्ण केल्याने त्यांना इन्स्पायर अवॉर्ड आणि राजीव गांधी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. राज्य सरकारने “आदिवासी रत्न’ देऊन त्यांना गौरवले.

डॉ. ढाक यांचा “मॉडेलिंग ऑफ मायक्रोक्‍लायमेट अँड रेफरन्स ईवॅपोट्रान्सपोरेशन इन पोलीहाऊस’ हा प्रबंध जर्मनी येथील लंबर्ट अकॅडमी पब्लिशिंग या आंतरराष्ट्रीय प्रकाशनाने पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशित केला आहे. सुमारे 450 पानांच्या या पुस्तकामध्ये पोलीहाऊसमधील तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, पाण्याचे बाष्पीभवन, वाऱ्याचा वेग या हवामान आधारित घटकांचा सखोल अभ्यास करून मॉडेल तयार करण्यात आले आहे. सध्या हे पुस्तक संपूर्ण जगभरात प्रकाशित झाले आहे.

जागतिक स्तरावरील नामांकित लंबर्ट अकॅडमीने पीएच.डी. प्रबंधाचे पुस्तकरूपाने प्रकाशित केल्याचा आनंद आहे. याचे श्रेय मुख्य प्राध्यापक डॉ. एस. आर. भाकर, प्रा. पी. के. सिंग यांचे आहे. वडील मधुकर ढाक, आई नंदा ढाक, मामा अशोक सापटे आणिपत्नी देवयानी ढाक यांचेही यशात महत्त्वाचे योगदान आहे.

गोखले एज्युकेशन सोसायटीचे महत्त्वाचे योगदान

तसेच महत्वाचे श्रेय गोखले एज्युकेशन सोसायटीला दिले. कारण १९७२ साली गोखले एज्युकेशन सोसायटीने वाकी येथे आश्रमशाळा स्थापन केली. त्याच वर्षी माझ्या आई वडिलांनी वाकी येथील आश्रमशाळेत अॅडमिशन घेऊन १ ली ते ७ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढील ८ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण कोसबाड येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक शाळेत पूर्ण केले. व आई प्राथमिक शिक्षिका व वडील देना बँकेत लागले. अती दुर्गम भागात गोखले एज्युकेशन सोसायटीने शाळा स्थापन केल्यामुळे आई-वडील सुशिक्षित झाले. व त्यामुळे पुढील वाटचाल गोखले एज्युकेशन सोसायटीमुळेच खूप सोपी झाली असे डॉ. सुमित ढाक यांनी मांडले.
तसेच वरिष्ठ प्राध्यापक प्रोफेसर एस. आर. भाकर आणि वरिष्ठ प्राध्यापक प्रोफेसर डॉ. पी. के. सिंग सर याचेही डॉ. सुमित ढाक यांनी आभार व्यक्त केले.

डॉ. सुमित सांगतात की ,२०१६ ते २०१८ मध्ये बिकट परिस्थिती असताना श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित यांची साथ लाभली, त्यामुळं जीवन कसे जगायचे व आदिवासी व गरीबांना न्याय देण्यासाठी आपले योगदान आवश्यक आहे ही महत्वाची शिकवण भाऊ कडून शिकायला मिळाली. त्यामुळे मी संघटनेचा आणि विवेक भाऊंचा कायम ऋणी असें असेही डॉ सुमित यांनी भावुक होऊन संगीतले.

श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ सुमित यांचे भरभरून कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here