पालघर – योगेश चांदेकर :

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या युरिया व खतांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याने खतांचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. दरम्यान औरंगाबाद येथे काही दिवसांपूर्वी शेतकऱ्याच्या वेशात कृषीमंत्री दादा भुसे यांनी कृषी केंद्रावरील खतांचा काळाबाजार चव्हाट्यावर आणला होता. मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांनी काही दिवसांपूर्वी असेच एक स्टिंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे कृषी विभागाने आज केलेल्या या कारवाईने पालघर जिल्ह्यात खतांच्या विक्रीत मोठा काळाबाजार होत असल्याच्या शंकेस पुष्टी मिळाली आहे.

सविस्तर बातमी अशी कि, पालघर जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली त्या-त्या तालुक्यांतील तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कृषी सेवा केंद्रांचे खत विक्री नोंद तपासली. तपासणी दरम्यान कमी भूक्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे अधिकची खत विक्री करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावर कडक कारवाई करत संबंधित कृषी सेवा केंद्र चालकांचा खते विक्री परवाना तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आला आहे.

एक दोन नव्हे तर जिल्ह्यातील जवळ जवळ १९ ते २० कृषी केंद्रांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. सध्या खरीप हंगाम असल्याने शेतकऱ्यांना खते मिळणे आवश्यक आहे. परंतु शेतकऱ्यांच्यासाठी आवंटित केलेला युरिया पॉस मशीन बंद असल्याने शेतकऱ्यांच्याच नावाने विक्री दाखवून काळ्या बाजारात विकला जात असल्याची चर्चा सुरु आहे. यामध्ये सबसिडी असणारी युरियाची पोती कृषी केंद्र धारकांकडे उचल दाखवून थेट परस्पर पॅकिंग बदलून काळ्या बाजारामध्ये विक्रीसाठी जातात. या सर्व प्रकरणात करोडो रुपयांचा काळाबाजार होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कृषी विभागाने केलेल्या कारवाईच शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here