पालघर: पॉस सिस्टीम बंद.. युरियाचा काळाबाजार जोरात…

0
506

पालघर – योगेश चांदेकर:

औरंगाबाद येथे काहीदिवसांपूर्वी शेतकऱ्याच्या वेशात कृषीमंत्री दादा भुसे यांनी कृषी केंद्रावरील खतांचा काळाबाजार चव्हाट्यावर आणला होता. दादा भुसेंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये कृषी केंद्र धारकांबरोबरच गुणवत्ता नियंत्रणचे अधिकारीही तितकेच जबाबदार असल्याचे उघडकीस आले होते. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यातील कृषी केंद्र धारकांना वचक बसला असेल असे वाटत होते परंतु पालघर जिल्ह्याचा विचार करता दादा भुसेंच्या स्टिंग ऑपरेशनचा काहीच परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.

पालघर जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून युरियाचा काळाबाजार सुरु असल्याचे चित्र आहे. सध्या खरीप हंगाम असल्याने शेतकऱ्यांना खते मिळणे आवश्यक आहे. परंतु शेतकऱ्यांच्यासाठी आवंटित केलेला युरिया पॉस मशीन बंद असल्याने शेतकऱ्यांच्याच नावाने विक्री दाखवून काळ्याबाजारात विकला जात असल्याची चर्चा सुरु आहे. यामध्ये सबसिडी असणारी युरियाची पोती कृषीकेंद्र धारकांकडे उचल दाखवून थेट परस्पर पॅकिंग बदलून काळाबाजारामध्ये विक्रीसाठी जातात. यासर्व प्रकरणात करोडो रुपयांचा काळाबाजार होत असल्याची चर्चा आहे.

पालघर जिल्ह्यात होत असलेल्या युरियाच्या काळाबाजारामध्ये एका बड्या लोकप्रतिनिधीचा हात असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे कृषि विभाग देखील युरियाच्या या काळाबाजाराकडे फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचे बोलले जात आहे. एकीकडे केंद्र सरकार युरियाचा काळाबाजार रोखण्यासाठी विविध पावले उचलत असताना पालघर जिल्ह्यात मात्र उलटे चित्र आहे. याला कोण आळा घालणार आणि शेतकऱ्यांच्या हक्काचा युरिया कंपन्यांना विक्री न होता शेतकऱ्यांना कधी मिळणार हे आता पाहावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here