पालघर: मध्यप्रदेशला पायी चालत निघालेल्या ३० जणांची प्रशासनाने केवळ ५ तासांतच केली सोय..!

0
409

पालघर – योगेश चांदेकर:

गुरुवारी सकाळी पत्रकार संतोष पाटील हे आपल्या मुलगा गौरवसह काही कामानिमित्त मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून बोईसरकडे निघाले होते. त्यावेळी त्यांना मेंढवण खिंड पासून थोड्या अंतरावर मनोर गेट हॉटेल समोर काही कुटुंब आपल्या चिमुकल्या मुलांसह डोक्यावर बोजा घेऊन पायी चालत जात असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ गाडी विरुद्ध दिशेने फिरवली आणि त्या लोकांना थांबवून झाडांच्या सावलीत बसायला सांगत त्यांची विचारपूस केली. सदर लोक हे मध्यप्रदेश येथील झाबुआ या ठिकाणचे असल्याचे तसेच हातावरचे पोट असल्याने व सर्व कामधंदा बंद झाल्याने बोईसर येथून पायीच निघालो आहे असे सांगितले.

बोईसर पासून जवळपास 20 किमी अंतर त्या सर्व मजुरांनी पायीच कापले होते. चालणाऱ्या मजुरांना मदतीचा विश्वास देत त्यांना थांबण्यास सांगितले. तसेच तातडीने सहाय्यक जिल्हाधिकारी किरण महाजन यांना फोन करत सदर घटनेची संपूर्ण माहिती दिली. त्याला सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर देत त्या लोकांना जिथे आहेत तिथेच थांबवण्याच्या सूचना केल्या. सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी पालघर तहसीलदार सुनील शिंदे यांना तात्काळ त्याठिकाणी पोहचून सर्वोतोपरी मदतीच्या सूचना दिल्या. त्यानुसार केवळ ५ तासांमध्ये त्या सर्व ३० जणांचे मेडिकल चेकअप पासून सर्व काम पालघर जिल्हा प्रशासनाने पूर्ण केलं आणि त्या सर्वांच्या गावी जाण्याची व्यवस्था केली.

वेळीच प्रसंगावधानता दाखवत या घटनेबद्दल प्रशासनाचे लक्ष वेधून घेतल्याबद्दल पत्रकार संतोष पाटील व त्यांचा मुलगा गौरव यांचे मजुरांनी व जिल्हाप्रशासनाने आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here