Real Hero: शिक्षकाने निभावले 35 विद्यार्थ्यांचे पालकत्व!

0
442

पालघर – योगेश चांदेकर:
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातल्याने तातडीच्या उपाययोजना सरकारने व प्रशासनाने सुरू केल्या. 10 वी 12 वी च्या बोर्ड परीक्षा वगळता शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. कठीण प्रसंगांमध्ये माणसातली माणूसकी जागी नाही झाली तर नवलच. दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देताना त्यांच्या मनावर भितीचे सावट निर्माण होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी 35 परीक्षार्थींना 1 मार्च पासून ते परीक्षा संपेपर्यंत आपल्या घरात राहण्याची व्यवस्था एका शिक्षकाने केली आहे.

जिल्हा परिषद शाळा धानिवरी शाळेतील वसंत धावजी बसवत या शिक्षक, मुख्याध्यापक सीताराम सोमण व इतर शिक्षक वृंद यांनी हे स्तुत्य काम केले आहे. वसंत धावजी बसवत यांनी स्वतःच्या घरात सर्व विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे. इतकेच नाही तर त्यांच्या दोन वेळा जेवणाची देखील त्यांनी स्वखर्चाने व्यवस्था केली आहे. मुलींची राहण्याची व्यवस्था स्वतःच्या घरात केली आहे तर मुलांना राहण्यासाठी समोरील घर भाड्याने घेतले असल्याचे समजते.

बहुतांश विद्यार्थ्यांचे आई-वडील हे वीटभट्टी कामगार आहेत. त्यांनी परीक्षा केंद्रावर जाण्या-येण्यासाठी लागणाऱ्या पैशाची कशीबशी तजवीज करून दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

वसंत बसवत यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्याला या कामे शाळेचे मुख्याध्यापक व इतर सहकारी शिक्षकांची विशेष मदत झाल्याचं बसवत यांनी सांगितलं.

भीतीच्या वातावरणात आम्ही परीक्षेला बाहेर पडू शकेल की नाही असे असताना सरांनी आम्हाला आधार दिला, आम्हाला मार्गदर्शन केले. आम्ही सरांचे ऋणी आहोत

  • विद्यार्थी

अतिशय खडतर परिस्थितीत हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वर्षभर त्यांनी अतिशय मेहनतीने अभ्यास केला आहे. त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी परीक्षेच्या काळात त्यांना आधार देणे हे माझं कर्तव्य समजून मी हे काम केलं आहे. याकामी सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचा मी आभारी आहे.

  • वसंत धावजी बसवत, शिक्षक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here