पालघर: रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकरी प्रकरणातील सर्व आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले..

0
388

पालघर – योगेश चांदेकर:

रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांची लुबाडणुक प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केला आहे. या प्रकरणात एका आरोपीस ६ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. तसेच उर्वरित चार आरोपींची पाच दिवसांची पोलीस कोठडी काल (२ जुलै) संपल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.

यातील मधुकर काकरा या आरोपीने पोलिस कोठडीत मारहाण झाल्याची तक्रार दिली होती. परंतु वैद्यकीय तपासणीत याबाबतचे कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी सदर आरोपीची पोलिस कोठडी मागितली होती. दरम्यान २९ जून रोजी आरोपींना अटक केल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव कोरोनाचे स्वॅब घेण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट आज (३ जुलै) प्राप्त झाला असून यातील एका आरोपीस कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे लागण झालेल्या आरोपीस तसेच उर्वरित आरोपींना सुनावण्यात आलेली पोलिस कोठडी व न्यायालयीन कोठडी स्थगित करण्याबरोबर आरोपींनी जामिनासाठी केलेला अर्ज दोन्ही पक्षातर्फे युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने नाकारला आहे. गुन्ह्याची व्याप्ती आणि गुन्ह्याचे स्वरूप पाहता शेतकऱ्यांची फसवणूक विचारात घेता आणि पोलिसांचा तपास या सर्व गोष्टी विचारात घेऊन न्यायालयाने आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले.

या गुन्ह्यात नव्याने नाव आलेले आरोपी निलेश गणपत पाटील, गणेश किसन आडगा, प्रकाश हरसन तांबडा, विनायक दामा कोदे, गोविंद जेठ्या हरपाले हे सध्या फरार आहेत. यातील दोन आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून तो सुनावणीसाठी प्रलंबित आहे. ॲड. सुधीर गुप्ता यांनी फिर्यादी पक्षाची बाजू तर ॲड. सुखदेवे यांनी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली.

पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा पालघर प्रशांत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, पोलीस उपनिरीक्षक प्रताप भोस यांनी याप्रकरणी तपास केला. याप्रकरणातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान यापूर्वी मनोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हे दाखल केले होते. याबाबत मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा पालघर यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे.


मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडत या प्रकरणाला वाचा फोडली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याकडे याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपींवर कारवाईची मागणी केली होती. याप्रश्नी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना कठोर शासन होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका मुंबई ई न्यूजने घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here