पालघर: रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकरी प्रकरण; आणखी २३ शेतकऱ्यांचे प्रतिज्ञापत्र..!

0
378

पालघर – योगेश चांदेकर:

रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांना लुबाडल्या प्रकरणी तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत दिवससेंदिवस वाढ होत आहे. याप्रकरणी डहाणू तालुक्यातील आणखी २३ शेतकऱ्यांनी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना प्रतिज्ञापत्र सादर करीत आरोपींविरोधात तक्रार दिली आहे. रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपींनी शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईपोटी मिळालेल्या रकमेतील ३५% रकमेची लुबाडणूक केली. यासंदर्भात आजअखेरीस एकूण १०७ शेतकऱ्यांनी तक्रार दिली आहे.

दरम्यान शेतकऱ्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आरोपींचा उल्लेख केला असून यामध्ये तत्कालीन शेतकरी समितीतील लोक, टीव्ही वाहिन्यांचे पत्रकार, सूर्यानगर येथील शिवसेनेचे कार्यकर्ते, पालघर जिल्हा माथाडी कामगार नेते, तत्कालीन कासा पोलीस स्टेशनमधील काही कर्मचारी, नुकसानभरपाई रक्कम जमा झालेल्या बँकेतील कर्मचारी, पालघर कलेक्टर ऑफिसच्या भूसंपादन विभागातील अधिकारी वर्ग, अशा एकूण पन्नास ते सत्तर जणांचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर गटाने दबाव आणून पैसे लुटल्याचे शेतकऱ्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हंटले आहे. याप्रकरणी येत्या काळात अनेक धक्कादायक नावे पुढे येतील अशी शक्यता काही शेतकरी बोलून दाखवत आहेत.

अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना समाजातील तथाकथित नेत्यांकडून दमदाटी होत असल्याने बहुसंख्य शेतकरी आपला जबाब नोंदविण्यासाठी पुढे येत नसल्याचे ही त्यांनी प्रतिज्ञापत्रात विशद केले आहे. या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करून संबंधित आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here