‘…तर प्रसंगी आम्ही मृत्यूला सामोरे जाऊ’; अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा एल्गार..!

0
426

मुंबई ई न्यूज नेटवर्क:

रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्प बाधितांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात प्रशासनाने तोडगा न काढल्यास, येत्या सोमवार पासून शेतकरी बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहेत. यासंदर्भात अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी पालघर यांना निवेदन दिले आहे. तसेच “आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. प्रसंगी आम्ही मृत्यूला सामोरे जायला तयार आहोत” असे अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकरणात शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्यावर अन्याय करणारे सूत्रधार, फरार आरोपी व अनेक दलालांना अद्यापही अटक करण्यात आली नाही. याप्रकरणी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विजय वझे आणि पत्रकार योगेश चांदेकर यांना ही विनाकारण त्रास देण्यात येत आहे. युरिया खताचा काळाबाजार करणाऱ्याचे स्टिंग ऑपरेशन करण्यास गेलेल्या पत्रकार योगेश चांदेकर यांना या प्रकरणात सामील असलेल्यांनी मारहाण केली. तसेच खोटा गुन्हा दाखल केला. अशा प्रकारचे गंभीर आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केले आहेत.

शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या चांदेकरांवरील खोटा गुन्हा रद्द करावा, रिलायन्स प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई व्हावी. अन्यथा संवैधानिक मार्गाचा आधार घेत बेमुदत आमरण उपोषण सुरू करू, असा इशारा अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here