पालघर: रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकरी प्रकरण; फरार आरोपींचा शोध घेणं गरजेचं..

0
425

पालघर – योगेश चांदेकर:

रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांना मिळालेल्या नुकसानभरपाईच्या एकूण रक्कमेपैकी ३५% रक्कम लुबाडणुक केल्याप्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली होती. अटकेत असलेल्या एका आरोपीस कोरोनाची लागण झाल्याने खबरदारीच्या दृष्टीने सर्वच आरोपींना सुनावण्यात आलेल्या पोलीस व न्यायालयीन कोठडीस न्यायालयाने स्थगिती दिली. गुन्ह्याची व्याप्ती आणि गुन्ह्याचे स्वरूप, शेतकऱ्यांची फसवणूक विचारात घेता आणि पोलिसांचा तपास या सर्व गोष्टी विचारात घेऊन न्यायालयाने आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले.

या गुन्ह्यात नव्याने नाव आलेल्या आरोपी निलेश गणपत पाटील, गणेश किसन आडगा, प्रकाश हरसन तांबडा, विनायक दामा कोदे, गोविंद जेठ्या हरपाले हे सध्या फरार आहेत. फरार आरोपी निलेश गणपत पाटील यास अटकेतील आरोपी मधुकर सखाराम काकरा याने ४० लाख रुपये, नारायण कान्हा डबके याने २८ लाख रुपये दिल्याचे पुरावे मिळाल्याचे पोलीसांच्या रिमांड रिपोर्टमध्ये नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे तपासाच्या दृष्टीने त्यास तात्काळ अटक होणे गरजेचे आहे.

बाधित शेतकऱ्यांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करत असताना आरोपींनी दमदाटी व शिवीगाळ करत दहशत निर्माण करून पैसे घेतल्याचे नोंदविले आहे. त्यामुळे फरार आरोपींकडून तक्रारदार शेतकऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न देखील होऊ शकतो. तसेच तात्काळ शोध घेत अटक न झाल्यास आरोपी पुरावे नष्ट करण्याचा देखील प्रयत्न करू शकतील अशी भीती तक्रारदारांमध्ये आहे. गुन्ह्याची व्याप्ती पाहता फरार आरोपींचा शोध घेणे पुढील तपासाच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here