रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी..!

0
391

मुंबई – [अरुण पाटील]:

एखाद्या व्यक्तीवर, समूहावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करणे हे पत्रकाराचे प्रथम कर्तव्य आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई ई न्यूजचे पालघर प्रतिनिधी योगेश चांदेकर यांना अनेक शेतकऱ्यांनी कॉलद्वारे रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पाच्या मिळालेल्या मोबदल्यातील ठराविक रक्कम काही लोकांनी जबरदस्तीने घेतल्याचे सांगितले. त्यानुसार योगेश चांदेकर यांनी विजय वझे व इतर शेतकऱ्यांना त्यांची भूमिका मांडण्यासाठी संधी दिली. सदर बातमी व एकूणच प्रकरण संवेदनशील असल्याने शेतकरी काय खुलासा करणार आहेत याची खात्री नसल्याने योगेश चांदेकर यांनी फेसबुक लाईव्ह करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये योगेश चांदेकर यांनी स्वतःहून कुणाचेही नाव घेतलेले नसताना मधुकर काकरा यांनी त्यांच्याविरुद्ध मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे उलटपक्षी शेतकऱ्यांनी केलेले आरोप पाहता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आता योगेश चांदेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी कासा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेण्याबाबत अर्ज दिला असल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांना जास्तीचा मोबदला मिळावा यासाठी तसेच जमीन अधिग्रहण बाबत पारदर्शकता असावी अशा मागण्यांसाठी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी रिलायन्स विरोधात मुठी आवळत एल्गार केला होता. रिलायन्स पाईपलाईन प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी कृती समिती स्थापन करत लॉंगमार्चचे नियोजन करत राज्यसरकारचे याकडे लक्ष वेधले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लॉंगमार्च काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक बोलावून चर्चा केली होती. तसेच रिलायन्स देत असलेल्या अत्यल्प नुकसानभरपाई ऐवजी ती वाढवून देण्याचे आदेश दिले होते. रिलायन्सने अनेकवेळा आढेवेढे घेण्याचा प्रयत्न देखील केला होता मात्र राज्यसरकार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. यातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांप्रती किती आग्रही होते हेही दिसून आले होते. रिलायन्सने सरकारचा आदेश मान्य करत टप्प्याटप्प्याने नुकसानभरपाई देण्यास सुरुवात केली होती. रिलायन्सकडून मिळालेल्या नुकसानभरपाईच्या रकमेतील ३० ते ३५ टक्के रक्कम दलालांनी लाटल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी केला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या निरक्षरतेचा गैरफायदा कुणी घेत असेल तर ते नक्कीच चुकीचे व निषेधार्ह आहे, शेतकऱ्यांनी आरोप केल्याप्रमाणे कथित टोळीमध्ये नक्की कोणकोण आहे याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल प्रचंड चीड आहे. वेळोवेळी त्यांनी शेतकऱ्यांबद्दलच्या त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याप्रकरणाबाबत काय भूमिका घेणार तसेच विरोधीपक्ष हे प्रकरण किती उचलून धरणार हे लवकरच समजेल.

“आरोप प्रत्यारोप करण्यासाठी मी कुणी राजकीय व्यक्ती नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे. पत्रकारिता हे माझ्यासाठी एक व्रत आहे त्यानुसार पिडीतांचा, शोषितांचा आवाज बनणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. शेतकऱ्यांनी केलेले आरोप हे खरे आहेत कि खोटे हे तपासण्याचे काम तपास यंत्रणांचे आहे. कुठल्याही दबावाला बळी न पडता अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी निर्भीडपणे पुढे येत याप्रकरणातील सत्य जगाला सांगणे गरजेचे आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही आकस किंवा पूर्वग्रह नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी मी करणार आहे.” – योगेश चांदेकर, पत्रकार ( 7276644464 )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here