पालघर- योगेश चांदेकर:
पालघर जिल्ह्यातील वसई तालुका वगळता उर्वरित क्षेत्र रेड झोन मधून वगळण्याची मागणी खासदार राजेंद्र गावित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. पालघर जिल्ह्यातील वसई तालुका व वसई विरार महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जास्त आहे. एकट्या वसई तालुक्यात १३४ कोरोनाग्रस्त आहेत. त्यापैकी ५७ जण कोरोनमुक्त झाले असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

पालघर तालुक्यात १६ रुग्ण असून यातील एकाचा मृत्यू झाला आहे तर कालच ९ जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज मिळाला आहे. तर डहाणू तालुक्यात कोरोनाचे ८ रुग्ण असून त्यापैकी एकजण कोरोनामुक्त झाला आहे.
“वसई तालुका वगळता उर्वरित क्षेत्र रेड झोन मधून वगळण्याची मागणी खासदार गावित यांनी केली आहे. संपूर्ण पालघर जिल्हा रेड झोन घोषित झाल्यास याचा अनेक उद्योगांवर मोठा विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच रोजगार न मिळाल्यास नागरिकांचे मोठे हाल होतील” असा युक्तिवाद खा. गावित यांनी केला आहे. या मागणीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे जिल्ह्यातील सर्वांचेच लक्ष लागले आहे.