MUMBAI e NEWS:

नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघ आणि एकूणच जिल्ह्यातील विविध प्रश्न बैठकीत मांडत आपल्या वेगळ्या कार्यपद्धतीची चुणूकच पालकमंत्र्यांना दाखवली. जिल्हा नियोजन समितीच्या या बैठकीस मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हेही रोहित पवारांच्या या मागण्यांमुळे अवाक झाले.

“जिल्ह्यात आतापासूनच काही भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागलीय. त्यामुळे गरज असेल तिथे तातडीने टँकर सुरु करावे. सध्या विहिरीला पाणी असल्यामुळे शेतकऱ्यांना गहू, हरभरा या रब्बी पिकांसह ऊस आणि फळबागांना पाणी द्यावं लागतं. परंतु अनेक ठिकाणी जळालेले डीपी तातडीने दुरुस्त केले जात नाहीत. तसेच मागणी असलेल्या ठिकाणी सिंगल फेज डीपीही बसवण्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा” असा मागण्यांचा पाढाच रोहित पवारांनी वाचला.

सर्वसामान्य कुटुंबातील मुलं शिकतात अशा जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था दयनीय झाली आहे. या शाळांची सुधारणा करण्यासाठी आणि तिथे अत्याधुनिक पद्धतीने शिक्षण कसं दिलं जाईल, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन द्यावा, हा मुद्दाही आमदार रोहित पवार यांनी यावेळी मांडला. त्यावर जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्याबाबत सकारात्मक असल्याचे सांगत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

“पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ही पहिलीच बैठक होती, त्यांनी जिल्ह्यातील प्रश्न बारकाईने समजावून घेतानाच कोणताही भेदभाव न करता प्रत्येक सदस्याला बोलण्यासाठी पुरेसा वेळही दिला. पुढच्या काळात हसन मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्त्वाखाली जिल्ह्याचा विकास वेगाने होईल, असा मला विश्वास आहे” असं मत आमदार रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवरून व्यक्त केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here