पालघर प्रतिनिधी (जितेंद्र पाटील) :

कोरोना विरुद्धच्या लढ्यात बचावासाठी सध्याच्या घडीला तरी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणात सध्या भारत देश जगात प्रथम स्थानावर आहे, तर देशात आपला महाराष्ट्र प्रथम स्थानावर आहे. असे आश्वासक चित्र असले तरी पालघर जिल्ह्यात मात्र विरोधाभास आहे. जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा आणि डोंगराळ भागाचा विचार करता या भागात लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याचे चित्र आहे. खेड्या पाड्यातील अनेक लसीकरण केंद्रात अजूनही येथील गरीब अशिक्षित आदिवासी समाज फार कमी प्रमाणात भाग घेताना दिसतोय. सायवन, कासा, तवा, तलवाडा व चारोटी या लसीकरणाच्या ठिकाणी तरी आत्ताच्या घडीला हीच परिस्थिती दिसून येत आहे. अशिक्षित व आदिवासी समाजात लशी विषयी असणारे गैरसमज यासाठीच प्रमुख कारण असून ग्रामीण भागात अफवांचे पेव फुटले आहेत.

ग्रामीण भागात अफवांचे पेव:

  • लस खोटी आहे, लस मध्ये औषध न देता पाणी भरून देतात. यामुळे या आजारावर लसीकरण नुसती एक फसवी प्रक्रिया आहे.
  • लसीकरणानंतर माणसे आजारी पडतात. लवकर बरे होत नाहीत. मग औषोधोपचाराला भरपूर खर्च होतो.
  • माणूस आजारी पडल्यानंतर आपणाकडे पैसे नसल्याने मग आपला मृत्यू होतो.
  • लसीकरणात विष भरुन दिले जात आहे त्यामुळे,आपला मृत्यू होईल व आपल्या जमिनी (प्राॕपर्ट्या) सरकार हडप करेल.
  • लसीकरणानंतर आपल्या किडन्या निकामी होणार मग आपल्या आयुष्याचे खरे नाही.
  • लसीकरणानंतर आपली प्रजनन क्षमता शून्य होणार. थोडक्यात पुढे भविष्यात आपल्याला मुल बाळ होणार नाहित किंवा हा सरकारचा लोकसंख्या नियंत्रणाचाच कार्यक्रम आहे.

अशा नाना तऱ्हेच्या अफवांचे पीक जिल्ह्यातील ग्रामीण भागात जोरात असल्याचे पहावयास मिळते आहे.

दरम्यान जिल्ह्यातील खेड्या पाड्यात आजही डॉक्टरांकडे उपचारासाठी न जाता भगताकडे जाऊन इलाज घेण्याचे प्रकार आढळून येतात. त्यामुळे असा समाज सहजासहजी तसेच जनजागृतीशिवाय लसीकरणाकडे वळणार नाही. १००% लसीकरण करायचे असेल प्रथम हे चुकीचे गैरसमज त्यांच्यातून पळवून लावावे लागतील. यासाठी या जनजागृती कार्यक्रम राबवत प्रसंगी समुपदेशन करावे लागेल. याकामी गावातील सुशिक्षित तरुणांना व शिक्षकांची मदत घेत लोकांना लसीकरणासाठी तयार करावे लागेल.

“अनेक गैरसमज असल्याने अशिक्षित व आदिवासी समाज लसीकरणापासून वंचीत राहिल व कोरोना हा आजार १००% हद्दपार करण्याचे शासनाचे प्रयत्न व आर्थिक खर्च फूकट जाईल. त्यासाठी मोठया प्रमाणात जनजागृती करावी लागेल तरच कोरोनाविरोधातील लढ्यात यश मिळेल.”
– संजीव झेंडू सावकारे (प्राथमिक शिक्षक, आदिवासी अभ्यासक)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here