पालघर: जीवनावश्यक वस्तूंची अव्वाच्या सव्वा दराने विक्री; महामारीच्या काळात माणुसकीला तिलांजली!

0
394

पालघर – योगेश चांदेकर:

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केलेली आहे. दरम्यान, ग्राहकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूची दुकाने सुरू ठेवण्यात आलेली आहेत. त्यामध्ये दूध डेअरी, किराणा दुकान, मेडिकल, धान्य दुकान, भाजीपाला आदी दुकानांना संचारबंदीमध्येदेखील गर्दी न करता दुकाने चालवण्यास परवानगी आहे. परंतु, ग्राहकांची मजबुरी पाहून आणि बंदचा फायदा घेण्यासाठी अनेक दुकानदार जीवनावश्यक वस्तूचे भाव अव्वाच्या-सव्वा आकारून ग्राहकांना वेठीस धरत आहेत. डहाणू तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक दुकानात अशीच चढ्या दराने विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती ग्राहकांनी मुंबई ई न्यूजला कळवली होती. दूध, ताक आणि अन्य वस्तूंची एम आर पी पेक्षा २ ते ३ रुपये जास्तीने विक्री करत असल्याचे निदर्शनास आले.

जमावबंदी, संचारबंदीच्या काळात किराणा दुकाने, दुध डेअरी, मेडिकल, भाजीपाला विक्रेत्यांना जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यास परवानगी आहे.कोरोनाशी दोन हात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य, संबंध देश आणि जगभरात जोमाने प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये दुकानदारांनी ग्राहकांना वैश्विक आपत्तीच्या या काळात धीर देणं आणि सहकार्य करने गरजेचे असताना नागरिकांना जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने विक्री करून त्यांना वेठीस धरणे निंदनीय आहे.

या महामारीचा काळात दुकानदारांनी ग्राहकांना सहकार्य करून आपले सामाजिक उत्तरदायित्व दाखवून द्यावे. जे दुकादार मंडळी चढ्यादराने विक्री करून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांना प्रशासनाच्यावतीने सूचना द्याव्यात आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तहसीलदार राहुल सारंग यांना याबाबत संपर्क साधला असता त्यांनी भरारी पथकांद्वारे अशा दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच नागरिकांनी सजग राहून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांची तक्रार प्रशासनाकडे करावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

  • “प्रशासन दैनंदिन लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. दुकानदारांनी संचारबंदीच्या काळात चढ्या दराने विक्री करण्याचे प्रकार निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. भरारी पथकांद्वारे तालुक्यात होणाऱ्या अशा प्रकारांवर लक्ष ठेवण्यात येईल. नागरिकांनी अशी चढ्या दराने खरेदी करू नये, कोणी अशी विक्री करत असेल तर तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा.” – राहुल सारंग, तहसीलदार डहाणू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here