पालघर: ‘या’ दुर्लक्षित कोरोना वॉरियरना मानाचा मुजरा – कुंदन संखे

0
384

पालघर – योगेश चांदेकर:

प्रशासनाचे अधिकारी, डॉक्टर्स -नर्स-स्टाफ असे आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, पोलीस प्रशासन, एस टी कर्मचारी यांच्या खांद्याला खांदा लावून या कठीण प्रसंगात आपल्या स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता अतिशय महत्वाची सेवा देणारा सफाई कर्मचारी काही अंशी दुर्लक्षित आहे. या महामारीच्या संकट प्रसंगातही तुम्ही घराबाहेर पडू नका असे आपण म्हणू शकत नाही. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कर्तव्य भावनेतून गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत असताना हा महत्वाचा घटक मदती पासून वंचित असल्याने त्यांना शिवसेननेचे जिल्ह्यातील नेते व निर्धार संघटनेचे अध्यक्ष कुंदन संखे यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

पालघर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आत्तापर्यंत कुंदन संखे यांनी ३८०० कुटुंबाना १० दिवस पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये ५५००० हजारांची मदत त्यांनी केली आहे. त्यांच्या निर्धार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत सफाई कर्मचाऱ्यांना मदतीची गरज असल्याचे समजले होते. त्यानंतर कुटुंबातील सदस्य संख्यांची माहिती घेत सरासरी १० दिवस पुरेल इतका धान्यसाठा त्यांनी गरजुंना दिला. यावेळी त्यांच्यासोबत खैरेपाडा सरपंच भावना धोडी, जिल्हा परिषद सदस्य शीतल धोडी, निर्धार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

“बोईसर (खैरेपाडा) येथील सफाई कर्मचारी बांधवाना मदत नव्हे तर या धान्यवाटपाच्या माध्यमातून कठीण प्रसंगात आपल्याला सेवा देण्याऱ्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांचे मला आभार मानता आले, याचाच मला आनंद आहे.” – कुंदन संखे, सामाजिक कार्यकर्ते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here