पालघर: त्या परिचारिकेसह इतर ९ जणांची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह..!

0
365

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर शहरात मिशन कंपाउंड येथे राहणाऱ्या व बृहन्मुंबई महानगरपालिकेत आरोग्य विभागात कार्यरत परिचारिकेचा दुसरा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे. तसेच टिमा हॉस्पिटल येथे उपचार घेत असणाऱ्या इतर ९ कोरोनाबाधितांचे देखील दुसऱ्या चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे समजते. शुक्रवारी रात्री उशिरा हे अहवाल प्राप्त झाले आहेत. याबरोबरच बोईसरमधील दलाल टॉवर भागातील त्या ३५ वर्षीय कोरोनाबाधित तरुणाच्या अति जोखमीच्या सहवासातील उर्वरित ४ संशयितांचे रिपोर्ट देखील निगेटिव्ह आले असल्याचे समजते.

टिमा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणाऱ्या त्या ९ कोरोना बाधितांमध्ये सफाळे येथील रुग्णांचा व त्या ३ वर्षीय मुलीच्या संपर्कातून कोरोनाची लागण झालेल्या काटाळे येथील रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेत आरोग्य विभागात कार्यरत त्या परिचारिकेची मुंबईमध्ये करण्यात आलेली पहिली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

बोईसरमधील दलाल टॉवर भागातील त्या ३५ वर्षीय कोरोनाबाधित तरुणाच्या कुटुंबातील इतर ३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या तिघांना वगळता इतर सर्व अतिजोखमीच्या सहवासातील संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here