पालघर – योगेश चांदेकर :
वेठबिगारीची अनिष्ट प्रथा चिरडून काढण्याचा विडा उचललेल्या श्रमजीवी संघटनेने कल्याण तालुक्यातील आणखी दोन वीटभट्टी मालकांना दणका दिला आहे. शहापूर तालुक्यातील सहा मजूरांना कल्याण मधील दोन मालकांच्या गुलामीतून मुक्त करण्यात आले आहे. या मजुरांनी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे मोकळा श्वास घेतला आहे. याबाबत दोन्ही मालकांविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे मानपाडा तसेच हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे.

सध्या वेठबिगार मुक्तीचा लढा श्रमजीवी संघटनेने अग्रस्थानी घेतला असून सर्वत्र गुलामीच्या पाशात अडकलेल्या हतबल मजूरांना मुक्त करण्याची मोहीम श्रमजीवीने युद्धपातळीवर हाती घेतली आहे. कल्याण तालुक्यातील नवापाडा उसरघर (डोंबिवली पूर्व) येथील मालक शिवनाथ म्हात्रे या मालकाने शहापूर मधील करंजपाडा येथील मजूर मनीष किसन गोतारणे यांस मारहाण करून धमकावले होते. बयाना देऊन मारहाण आणि बळजबरीने बायणापोटी काम करून घेण्याचा प्रयत्न केला, मारहाण झाल्याने भीतीपोटी हा मजूर पळून गेला मात्र मालक त्याच्या शोधात होता. ही बाब श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी मजुराचा शोध घेऊन त्याला घोटी येथून आणले आणि सर्व हकीकत ऐकून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
हे पूर्ण कुटुंब वेठबिगारीच्या पाशातून मुक्त झाले.


हे पूर्ण कुटुंब वेठबिगारीच्या पाशातून मुक्त झाले.

दुसरे मजूर देखील शहापूर येथील भागदल दहिवली येथील रामदास झिपा हिलम आणि त्याच्या कुटुंबास यांस कल्याण मधील करवले गावातील मालक किसन भंडारी यांनी बयाना देऊन गुलाम बनवलेले. पत्नीची प्रसूती झाल्याने मजूर पत्नीकडे गेल्याचा राग धरून मालक किसन भंडारी, त्याचा मुकादम आणि बाब्या नामक इसमाने त्याला पत्नीच्या गावात जाऊन बेदम मारहाण करत आणले आणि जनावराप्रमाणे साखळदंडाने बांधून बेदम मारहाण केली. ही बाब श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी रात्री उशिरा पोलिसांना सोबत घेत भट्टी आहे त्या ठिकाणी धाव घेत या मजुराला कुटुंबासह मुक्त केले. त्या मालक आणि सहकऱ्यांविरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दोन्ही गुन्हे दाखल करताना कार्यकर्त्यांनी तब्बल 24 तास सततच संघर्ष करत फिर्याद नोंदवून घेतली. याबाबत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी भरभरून कौतुक करत कार्यकर्त्यांना वेठबिगार प्रथे विरोधातील लढाई दिल्याबद्दल बक्षीस जाहीर केले.

आजही मालक आपल्या व्यावसायिक हव्यासापोटी आदिवासी गरीब मजूरांना गुलाम बनवून जनावरासारखी वागणूक देत आहेत हे अत्यंत निंदनीय असल्याचे विवेक पंडित यांनी सांगितले. या गुलामी विरोधात श्रमजीवी टोकाचा लढा देईल असेही ते म्हणाले.

यावेळी श्रमजीवी संघटनेने कातकरी घटक प्रमुख गणपत हिलीम तसेच जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी गुन्हा दाखल करण्यासाठी राञ भर थांबलेले कार्यकर्ते खरोखरच कौतुकास पात्र होते यात संघटनेचे बाळाराम भोईर, दशरथ भालके, प्रकाश खोडका ,कमळाबाई तरणे, गौतम पाटील, उज्वला शिंपी, गणपत हिलीम यांचा मुलगाही आपल्या वडिलांचा गरीब मजुरांसाठीचा संघर्ष पाहत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here