MUMBAI e NEWS :
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहले. या पत्राव्दारे त्यांनी बंदोबस्तावेळी होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची व्यथा मांडली आहे. मिरज मधील गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात आयोजित कार्यक्रमात पवारांनी उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी पवारांनी राज्यातील मंत्री, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती यांच्या दौऱ्यांप्रसंगी गर्दी नियंत्रण, कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने तैनात असलेल्या पोलिसांच्या प्रश्नांकडे आयोजकांचे व उपस्थितांचे लक्ष वेधले.

शरद पवार म्हणाले, जाहीर सभा वा दौऱ्यांच्या ठिकाणी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या आगमन आणि प्रस्थानावेळी पोलीस प्रशासनावर विशेष ताण असतो. इतर वेळी पोलिस कर्मचाऱ्यांना तासनतास तिष्ठत उभे राहावे लागते. केवळ पोलीस कर्मचारीच नाही तर अशा सभाप्रसंगी पोलीस अधीक्षक व वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील तिष्ठत उभे राहतात. सभेच्या बंदोबस्तावेळी पोलीस कर्मचारी-अधिकारी यांनी तत्पर व सज्ज असावयास हवे, मात्र सभा सुरळीत सुरू असताना विशेषत: महिला पोलीस कर्मचाऱ्यांना निष्कारण त्रास सहन करावा लागतो असे मला वाटते. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील तिष्ठत राहणे मला उचित वाटत नाही.

त्यामुळे सभा शांततेत शुरू असताना महिला पोलीस कर्मचारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार बसण्यासाठी खुर्ची अथवा आसन उपलब्ध करून देण्याविषयक संयोजकांना मार्गदर्शक सूचना निर्गमित व्हाव्यात व पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांना गृह विभागामार्फत तशी मुभा असावी, अशी विनंती करणारे पत्र मी महाराष्ट्र राज्याच्या माननीय गृहमंत्र्यांना पाठवले आहे. गृहमंत्री या बाबीकडे वैयक्तिक रीतीने लक्ष देतील, अशी मला अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here