पालघर – योगेश चांदेकर:
पालघर ग्रामीण मध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख बदलावरून राजकीय घमासान सुरू असतानाच सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीच जनमानस आणि शिवसैनिकांमधून आलेल्या जनमताला खोटे ठरविण्याचा विडा उचलला आहे. पालघर ग्रामीण मधील सामान्य शिवसैनिक सध्या जिल्हाप्रमुख राजेश शहा यांच्याविरोधात आक्रमक झाले असल्याची बातमी मुंबई ई न्यूज ने १९ जुलै रोजी प्रसिध्द केली होती. यामध्ये शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये जिल्हाप्रमुखांच्या अकार्यक्षमतेविषयी असणारी तीव्र नाराजी, बालेकिल्ल्यातच होणारी सेनेची पीछेहाट या सत्य परिस्थितीचा उहापोह करण्यात आला होता.
मूंबई ई न्यूजने प्रसिध्द केलेल्या या बातमीसंदर्भात अधिक विश्वसनीय माहिती मिळावी आणि सत्यता पडताळणीसाठी २० जुलै रोजी एक पोल घेतला. या पोलला तब्बल १० हजारांच्यावर लोकांनी वोट दिले. यातून मुंबई ई न्यूजने मांडलेली नाराजीनाट्याची बातमी साधार आणि विश्वसार्ह असल्याचे स्पष्ट झाले. मात्र सेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी हा पोल प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर, मुंबई ई न्यूज या माध्यमाला असा पोल घेण्याचा अधिकार कोणी दिला अशा पोस्ट फिरवल्या. तसेच मुंबई ई न्यूजच्या बातमीच्या सत्यतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले.

मुंबई ई न्यूजने घेतलेला पोल सर्वांसाठी खुला असताना देखील या पदाधिकाऱ्यांनी शंका उपस्थित केल्या. ज्या पदाधिकाऱ्यांनी या शंका कुशंका उपस्थित करून पोलबाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित केले हे विद्यमान जिल्हाप्रमुखांच्या जवळचे असल्याचे शिवसैनिकांमध्ये बोलले जात आहे. तसेच शिवसेना हा आदेशावर चालणारा पक्ष असल्याचा निर्वाळा काही पदाधिकाऱ्यांनी दिला होता. मुळातच हा पोल घेत असताना तो कुणी स्विकारणे अथवा नाकारणे हा उद्देशच नव्हता तर फक्त सर्वसामान्य शिवसैनिकांच्यात असलेली भावना स्पष्ट करून त्याची सत्यता तपासणे हा होता. माध्यमे जेव्हा अशा प्रकारे पोल घेत असतात तेव्हा तो कुणी स्विकारावा अथवा स्विकारू नये हा ज्या त्या संघटनेचा प्रश्न आहे. मात्र पदाधिकाऱ्यांनी माध्यमाच्या विश्वसार्हतेविषयी शंका उपस्थित करणे फार दुर्दैवी आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा आवाज बनू पाहणाऱ्या मुंबई ई न्यूज सारख्या डिजीटल माध्यमाची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रयत्न असल्याचेच स्पष्ट होत आहे.
मुंबई ई न्यूजने आत्तापर्यंत सर्वसामान्यांचा आवाज बनत विविध प्रकरणे तडीस नेली आहेत. त्यामुळे या माध्यमाची जनसामान्यांमध्ये खास अशी ओळख निर्माण झाली आहे. मुंबई ई न्यूज यापुढे देखील आपला पत्रकारितेचा वसा याच प्रकारे सुरू ठेवणार असून कुठल्याही दबाव तंत्राला बळी पडणार नाही. सध्याच्या पालघर ग्रामीण मधील शिवसेना नेतृत्वबदलाविषयी सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये असलेली भावना आणि त्याची होत असलेली चर्चा बघून जिल्ह्यातील विद्यमान नेतृत्वाने धसका घेतल्याचेच पदाधिकाऱ्यांनी सोशल मिडीयावरून फिरवलेल्या पोस्टमधून दिसून येत आहे. त्यामुळे कितीही सारवासारव केली तरी शिवसैनिकांच्यात नेतृत्व बदलाविषयी असलेली भावना मात्र या पोलमधून स्पष्ट झाली आहे हे नक्की..!