पालघर: शिवसेना जिल्हाप्रमुख बदलणार..; तर्क-वितर्कांना उधाण..!

0
520

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश शहा यांना पदावरून बाजूला करून उमद्या नेतृत्वाला संधी द्यावी यासाठी पालघर ग्रामीण मधील शिवसैनिक आक्रमक झालेत. मागील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत झालेली सेनेची पीछेहाट, कार्यकर्त्यांशी नसलेला संवाद, यामुळे आपल्याच बालेकिल्ल्यात परत बॅकफूटवर जाण्याची वेळ सध्या सेनेवर आली आहे. स्थानिक नेतृत्वाला सतत डावलल्यानेच ही वेळ आली असल्याने सच्चा शिवसैनिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पक्षाची होणारी पिछेहाट रोखण्यासाठी शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख बदलणार असल्याची खात्रीलायक माहिती मुंबई ई न्यूजला सेनेतील पदाधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. त्यामुळे एकूणच जिल्ह्यात जिल्हाप्रमुख बदलाची चर्चा जोरात आहे. जिल्हाप्रमुख राजेश शहा यांची हकालपट्टी झाल्यास जिल्हाप्रमुख पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार यावरून शिवसैनिकांमध्ये पैजा लागल्या आहेत.

पूर्वीचा ठाणे आणि आत्ताचा पालघर जिल्हा ग्रामीण मध्ये आनंदराव दिघे आणि एकनाथ शिंदे यांनी सेनेच्या कार्यकर्त्यांची चांगली मोट बांधली. पक्षाच्या अडचणीच्या काळात कार्यकर्ते सांभाळून जिल्ह्यात पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले. पालघर विधानसभेची पोटनिवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ताकदीने लढवली, त्यामुळे पालघर ग्रामीण हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. असे असताना सध्याच्या जिल्हाप्रमुखांमुळे या वरिष्ठ नेत्यांनी केलेली मेहनत वाया जाऊ लागली आहे. जिल्हाप्रमुख राजेश शहा स्थानिक कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करत असून त्यांना डावलत असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. यामुळे स्थानिक कार्यकर्ते संतापले असून त्यांनी विद्यमान जिल्हाप्रमुखांना थेट पदावरून दूर सारण्याची मागणी केली आहे. तसेच राजेश शहा यांना हटवून उमद्या नेतृत्वाला संधी देण्याची मागणी केली आहे.

शिवसेना पक्षश्रेष्ठी याबाबत काय निर्णय घेणार याकडे सामान्य शिवसैनिकांसह जिल्ह्यातील सर्वच पक्षाच्या नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here