‘त्या’ कामगारांसाठी ‘शिवशक्ती’ मैदानात; सरकारकडे केली ‘हि’ मागणी..!

0
437

पालघर – योगेश चांदेकर:

कोरोना या महाभयंकर व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. देशातही मोठ्या प्रमाणात फैलावत असून या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आला आहे. अत्यावश्यक गरजेशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये असे निर्देश सरकारने दिले आहेत. अशा परिस्थिती मध्ये औषध निर्मिती कंपन्यांना उत्पादन सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना जीव मुठीत घेऊन देशाची गरज ओळखून व कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कामावर जावे लागत आहे. त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शिवशक्ती सामाजिक संघटनेने या कामगारांच्यासाठी तारापूर इंडस्ट्रियल असॊसिएशनच्या अध्यक्षांना पत्र लिहून त्यांच्या अडचणींकडे लक्ष वेधले आहे. देशसेवेच्या भावनेनेच हे कामगार काम करत असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

अनेक गावांमध्ये प्रवेश करण्याचे रस्ते अडवण्यात आले आहेत, अशा परिस्थितीत देखील कामगार कामावर हजार रहात आहेत. देशाची औषधांची गरज ओळखून हे कामगार आरोग्यास धोका असताना देखील एकप्रकारे देशसेवाच बजावत आहेत. अशावेळी त्यांना आरोग्य सुविधेसाठी काम करणाऱ्या डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे गरजेचे सेफ्टी किट देण्यात यावे. कंपनीद्वारे अथवा सरकार कडून त्यांना विमा संरक्षण मिळावे. त्यांच्या येण्याजाण्याची व जेवणाची योग्य ती सोय करावी अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.

शिवशक्ती सामाजिक संघटनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष संजय पाटील यांनी हे निवेदन दिले आहे. या मागणीचा फक्त पालघर जिल्ह्यापुरताच विचार न करता संपूर्ण महाराष्ट्रात सध्याच्या घडीला काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विचार व्हावा अशी त्यांची आग्रही मागणी आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, पालघर जिल्हा पालकमंत्री दादासाहेब भुसे यांचेही याप्रश्नी लक्ष वेधले आहे. राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्व कामगारांचे लक्ष लागून आहे.

“देशाची औषधांची गरज ओळखून हे कामगार आरोग्यास धोका असताना देखील एकप्रकारे देशसेवाच बजावत आहेत.. आरोग्य सुविधेसाठी काम करणाऱ्या डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे गरजेचे सेफ्टी किट देण्यात यावे. कंपनीद्वारे अथवा सरकार कडून त्यांना विमा संरक्षण मिळावे. त्यांच्या येण्याजाण्याची व जेवणाची योग्य ती सोय करावी”

– संजय पाटील, पालघर जिल्हा अध्यक्ष(शिवशक्ती सामाजिक संघटना)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here