पालघर: खळबळजनक; अर्थपूर्ण व्यवहार करून देखील माजी आमदार अमित घोडा यांना सेनेत डावललं जातंय!

0
533

पालघर – योगेश चांदेकर:

राजकारणातील घराणेशाहीवर तासंतास बोललं जाताना आपण पाहतो मात्र २४ तास समाजसेवेत, राजकारणात सक्रिय नेत्याचे कुटुंब त्याच्या अकाली जाण्याच्या धक्क्यातून सावरताना त्यांना कोणकोणत्या गोष्टींना तोंड द्यावे लागते याकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष होताना दिसते. पालघर जिल्ह्यातही एक ना राजकीय कुटुंबांच्या वाट्याला हा संघर्ष आल्याचे पाहावयास मिळते. असाच संघर्ष दिवंगत आमदार कृष्णा घोडा यांच्या कुटुंबाच्या वाट्याला आला आहे. पोटनिवडणुकीत सेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या अमित घोडा यांचे तिकीट २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षनेतृत्वाने कापले आणि आजवर त्यांचे पुनर्वसन न करता त्यांना अडगळीतच ठेवण्यात आल्याची जनभावना निर्माण झाली आहे.

दिवंगत आमदार कृष्णा घोडा यांनी २०१४ विधानसभेला राष्ट्रवादीला राम राम ठोकत सेनेचा भगवा हातात घेतला. २०१४ विधानसभेला काँग्रेस उमेदवार तत्कालीन राज्यमंत्री राजेंद्र गावित यांचा पराभव करत पालघरवर भगवा फडकावला. मात्र नियतीने अल्पावधीतच विजयाचा आनंद हिरावून घेतला आणि हृदय विकाराच्या धक्क्याने आमदार कृष्णा घोडा यांचे निधन झाले. पालघर जिल्ह्यातून ४ वेळा विधानसभेवर जाणारे दिवंगत आमदार कृष्णा घोडा यांचे आजही जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांच्या मनावर गारुड आहे. त्यांचे पुत्र पालघर विधानसभेचे माजी आमदार अमित घोडा हे सध्या राजकीय विजनवासात आहेत.

संग्रहित छायाचित्र [२०१६ – पालघर विधानसभा पोटनिवडणूक ]

दरम्यान २०१९ विधानसभेला तिकीट नाकारल्यानंतर बंडखोरी करत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेणाऱ्या घोडा यांना पक्षनेतृत्वाने पुनर्वसन करण्याचा शब्द दिल्याने त्यांनी माघार घेत पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या मागे सर्व ताकत उभी केली. पक्षासाठी प्रतिष्ठेची बनलेली पालघर विधानसभेची जागा राखण्यातही यश मिळाले मात्र सध्या पक्षातीलच स्थानिक नेतृत्वाकडून घोडा यांना डावललं जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमधून बोलून दाखवली जात आहे. एवढंच नाही तर त्यांना शिवसेनेच्या मेळावे, आढावा बैठका, उद्धघाटन कार्यक्रमांना जाणून बुजून बोलावलं जात नसल्याचा आरोपही कार्यकर्त्यांमधून होत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची संधी माजी आमदार अमित घोडा यांच्या पत्नीला मिळावी यासाठी कार्यकर्त्यांनी जंग पछाडला मात्र त्याही ठिकाणी डावलण्यात आले. निष्ठेने पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच पक्ष डावलत असल्याची भावना घोडा समर्थकांमध्ये वाढीस लागली आहे. या रोषाचे रूपांतर पक्षांतरात होणार का हे येणारा काळच सांगेल.

अर्थपूर्ण उलाढाल हे हि डावलण्याचं एक कारण?

“२०१९ विधानसभेला पक्षातील स्थानिक नेतृत्वाने तुम्हालाच तिकीट देतो असा शब्द देत अर्थपूर्ण उलाढाली केल्या. माजी आमदार अमित घोडा हे राजकारणात नवखे असल्याचा फायदा घेत त्यांच्याकडून आर्थिक रसद घेण्यात पक्षातील काही लोकांना यश देखील मिळाले. मात्र पक्ष नेतृत्वाने दिवंगत खासदार वनगा यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्याचा दिलेला शब्द पाळत श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली. त्यामुळे तोंडघशी पडलेल्या ‘त्या’ नेत्याकडे अमित घोडा यांनी तगादा लावल्यानेच त्यांना डावललं जात आहे” असा धक्कादायक खुलासा घोडा यांच्या अगदी जवळच्या कार्यकर्त्याने केला आहे. त्यामुळे खरंच घोडा यांना नेमकं याच कारणाने डावलण्यात येत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत माजी आमदार अमित घोडा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून या आरोपाला अद्याप पुष्टी मिळू शकली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here