पालघर: धक्कादायक! पाण्याच्या कालव्यामध्ये औष्णिक विद्युत केंद्रातील केमिकलमिश्रित राख? नागरिकांच्या जीवाशी खेळ..

जमिनीचा पोत खराब झाल्यास शेतकऱ्यांचं मोठं नुकसान.. या घटनेला जबाबदार कोण?

0
1819

पालघर प्रतिनिधी – जितेंद्र पाटील:

मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या बाजूने असलेल्या कासा-भराड सूर्या कालव्यामध्ये कल्लू ढाबा येथून वाहणाऱ्या कालव्यामध्ये औष्णिक विद्युत केंद्रातील राख टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या उजव्या कालव्यातून आसपासच्या शेत शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाते. या कालव्याच्या सिंचनावर लोक दुबार शेती करतात. त्यामुळे कालव्यात सोडण्यात आलेलं हि केमिकल मिश्रित राख शेती शिवारात जात आहे. त्यामुळे जमिनीचा पोत खराब होऊन येथील भात पिकाला याचा मोठा फटका बसणार आहे. तसेच काही लोक या पाण्याचा उन्हाळ्यात पिण्यासाठी देखील मोठा वापर करतात. केमिकल मिश्रित राख सोडल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ या धक्कादायक घटनेबाबत अनभिज्ञ असल्याचे समजले. त्यामुळं भागातील नागरिकांचे आरोग्य वाऱ्यावर सोडले आहे का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांना पुढील काही वर्ष देखील नापिकीच्या संकटाला तोंड द्यावे लागू शकते.

डहाणू येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे. काही राजकीय लोकांचा आशीर्वाद, प्रदूषण मंडळ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतचे साटेलोटे यामुळे या कंपन्या ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे सांडपाण्याची विल्हेवाट न करता ते थेट कालव्यात सोडतात. या सांडपाण्यातून निघणारी दुर्गंधी व विषारी वायू यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. कासा येथून वाहणाऱ्या या छोट्या कालव्यामध्ये दररोज रात्री या कंपन्याच्या केमिकल युक्त राख मुंबई अहमदाबाद हायवे चारोटी येथील कल्लू ढाबाच्या बाजूने वाहणाऱ्या कालव्यामध्ये सोडतात. याविषयीच्या सातत्याने होणाऱ्या तक्रारींकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या घटनेमुळे सध्या कालव्यातील पाणी बंद केले आहे, मात्र पाणी चालू केले असता कालव्यात पांढरा फेस मोठ्या प्रमाणात दिसून येतो. रात्री या कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात राख टाकल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे परिसरात उग्र वास पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही ग्रामस्थांना डोळे जळजळणे, मळमळ होणे, उग्र वासामुळे शिंका येणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे आरोग्याला धोका होतोय कि काय अशा भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ आहेत. नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळं थेट प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याविरोधातच हरित लवादाकडे तक्रार करण्याचा इशारा शेतकरी व रहिवाशांनी दिला आहे.

“घटनास्थळी पाहणी करण्यास गेलो असता सदर कालव्यात मोठ्या प्रमाणात केमिकल मिश्रित राख सोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खबरदारी म्हणून मी आमच्या वरिष्ठांना या घटनेविषयी माहिती दिली आहे. तसेच घडलेल्या अनुचित प्रकाराची चौकशी व्हावी यासाठी पोलिसांना देखील याबाबत लेखी तक्रार दिली आहे.”
– प्रविण भुसारे, सूर्या पाटबंधारे अभियंता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here