धक्कादायक: संचारबंदीच्या आदेशाला केराची टोपली; मजुरांच्या जीवाशी खेळ..!

0
417

पालघर – योगेश चांदेकर:
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असताना, कम्युनिटी संसर्ग होण्याचा धोका ओळखून केंद्र सरकारने संपूर्ण देशात २१ दिवसांसाठी संचारबंदी लागू केली आहे. मात्र संचारबंदीच्या या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचे काम पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील मोगरबाव परनाली वावे आदि भागातील वाडी मालकांकडून केले जात आहे. दुर्गम आदिवासी भागातील ग्रामस्थांच्या अज्ञानाचा गैरफायदा काही वाडीमालक घेताना दिसत आहेत. मुंबई ई न्यूजने असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आणले आहे. प्रशासन जीवतोड मेहनत घेऊन कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करत असताना अशी धक्कादायक घटना दुर्दैवी आहे.

मुंबई ई न्यूजचे पालघर प्रतिनिधी योगेश चांदेकर यांनी हे प्रकरण समोर आणले आहे. पिकअप सारख्या वाहनामधून १०-१५ मजुरांना एकत्र बसवून कामाच्या ठिकाणी ने-आण केली जाते. यातील एका मजुराचा जरी कोरोना बाधित रुग्णाशी संपर्क आला तर अनर्थ होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना सुट्टी देऊन त्यांना सर्वोपरी मदत करण्याचं आवाहन केलं आहे. संपूर्ण जग या मानवतेवर आलेल्या संकटाला तोंड देत असताना काही लोकांकडून वैयक्तिक स्वार्थाचं काम होताना दिसत आहे.

संचारबंदी उल्लंघनाच्या या प्रकरणात संबंधितांवर प्रशासन काय कारवाई करणार याकडे डहाणू तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

  • “सरकारने फक्त घोषणा केल्याने हातावर पोट असलेल्या मजुरांना घरी बसता येणार नाही. प्रत्यक्षात सरकारची कोणतीही मदत त्यांना मिळाली नसल्याचं कळते आहे. सरकारने याकडे लक्ष देऊन त्यांना मदत करावी व त्यांच्या पोटाचा प्रश्न सोडवावा.” – विवेक पंडित, श्रमजीवी संघटना संस्थापक तथा अनुसूचित क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा)
  • “डहाणू तालुक्यातील मोगरबाव परनाली वावे आदि भागातील वाडी मालक मजुरांच्या जीवाशी खेळत आहेत. देव न करो पण एखादा बाधित रुग्ण संपर्कात आल्यास उद्या याची जबाबदारी कोण घेणार? धक्कादायक बाब म्हणजे या मजुरांमध्ये बालमजुरांचाही समावेश आहे. प्रशासनाने याची चौकशी करून तातडीने कारवाई करावी.” – पिंटु गहला, उपसभापती पंचायत समिती डहाणू
  • “संचारबंदी मध्ये फक्त अत्यावश्यक सेवा संबंधिच कामे सुरु ठेवण्यासाठी काही अटींसाठी परवानगी दिली आहे. वाडी मालकांनी कामगारांच्या आरोग्याची काळजी घेऊन काम बंद ठेवायला हवं.” – ब्रायन लोबो, कष्टकरी संघटना

  • “प्रसाशनाने कामगारांच्या आरोग्यासाठी विविध पावले उचलली आहेत. याबद्दल सामान्य आदिवासी कामगारांना जागरूक करून सुविधा प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसेच या परिस्थितीत संसर्ग प्रसार होऊ नये यासाठी नियमांचे पालन महत्वाचे आहे.” – सचिन सातवी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here