पालघर- योगेश चांदेकर :
श्रमजीवी वादळ आज ठाण्यात धडकले. हजारो आदिवासी आज रणरणत्या उन्हात आपल्या न्याय्य हक्काच्या मागण्या घेऊन मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आले, मागण्या मान्य झाल्या नाही तर मातोश्रीवर धाडण्याच्या तयारीत हे कष्टकरी बांधव आलेले, स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईचा आज आरंभ झाला. 2022 पर्यंत गरीब आदिवासींचे मूलभूत प्रश्न मार्गी लागावेत या मागणीसाठी टोकाचा संघर्ष करण्याची घोषणा संस्थापक विवेक पंडित यांनी २६ जानेवारी रोजी केली होती. त्यानुसार आज या लढाईचे पाहिले भव्य आंदोलन महाराष्ट्राने पाहिले.
भारतीय स्वतंत्र्य पंचाहत्तरी आले मात्र स्वातंत्र्य हे स्वातंत्र काही मूठभर लोकांना मिळाले, लाखो आदिवासी कष्टकरी गरिबांच्या झोपडीत स्वातंत्र्याचा प्रकाश आलाच असे सांगत श्रमजीवी संघटनेने आज निर्धार मोर्चाने ठाण्यात धडक दिली. स्वातंत्र्याचा हा प्रकाश गरिब कष्टकऱ्यांच्या घरा घरात पोहचत नाही तो पर्यंत ही लढाई सुरुच राहणार असा निर्धार आज उपकार्याध्यक्ष स्नेहा दुबे पंडित यांनी व्यक्त केला.

श्रमजीवीच्या सर्व मागण्या न्याय्य आहेत असे सांगत सर्व मागण्या मान्य करत त्याबाबत कालबध्द कार्यक्रम ठरवून सोडवू असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. या अश्वासनामुळे मोर्चाचा ठाण्यातच समारोप झाला

 ठाण्यात मोर्चाच्या सुरुवात होण्यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विवेक पंडित आणि शिष्टमंडळाला चर्चेसाठी आमंत्रित केले.चर्चेत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली तर मोर्चाच समारोप होईल  अन्यथा आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका यावेळी मोर्चेकऱ्यांनी व्यक्त होती, उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासोबत केलेली चर्चा आणि घेतलेली भूमिका सकारात्मक असल्याने आंदोलकांनी समाधान व्यक्त केला.

आज विवेक पंडित,विद्युल्लता पंडित अध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. वन हक्क, घराखालील जागा नावावर करणे, आदिवासींच्या जातीच्या दाखल्याच्या जाचक अटी, आरोग्याचा प्रश्न, आदिवासी मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, स्थलांतरित आदिवासींच्या रोजगाराचा प्रश्न, पिण्याचे पाणी, रस्ता ,घरकुल, रेशनी, कुपोषण, रोजगार हमी, शेती विकास यांसारख्या अनेक प्रश्नांसह कामगारांचे प्रश्न असे सविस्तर चर्चा आज उद्धव ठाकरे यांनी शासनाच्या काही प्रमुख अधिकाऱ्यांनाही पाचारण केले होते. त्यानुसार आज श्रमजीवीच्या एक शिष्टमंडळाची मोर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत ठळक मान्य मागण्या

●2022 पर्यंत आदिवासी कष्टकऱ्यांना त्यांचे मूलभुत अधिकार देण्याचे मान्य, याबाबत सर्व सचिवांना कालबद्ध कार्यक्रम बनविण्याचे आदेश.

●प्रत्येक आदिवासीला दिवाबत्तीसाठी केरोसीन मिळणार.

●2022 पर्यंत प्रत्येक आदीवासीचे हक्काचे घर असेल अशी व्यवस्था करणार.

●आश्रमशाळांचे आधुनिकीकरण करून तालुका, जिल्हास्तरावर आश्रमशाळा, महाविद्यालय,हॉस्टेल असलेले एक शिक्षण संकुल निर्माण करणार.

●वन हक्काच्या प्रश्नावर सर्व विभागाच्या सचिवांना डेडलाईनसह कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्याचे मान्य.

●जातीच्या दाखल्याच्या 1950 सालच्या पुराव्याच्या अटी बाबत अधिकाऱ्यांनी आग्रही न राहता, इतर पर्याय वापरून ,वस्तुनिष्ठ पुरावे वापरून दाखले देण्यात यावे असे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले.
यांसह इतर अनेक प्रश्नावर चर्चा करून श्रमजीवी संघघटनेसोबत मुख्यमंत्री ठाकरेंसोबत तपशीलवार चर्चा केली.  

लढाई अभी बाकी हे – विद्युल्लता पंडित

आजची चर्चा समाधानकारक होती, मुख्यमंत्री हे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिकेत आहेत, मात्र आपले हक्क आपल्याला सहज मिळणार नाही. लढाई ही अटळ आहे, न्याय्य हक्कांसाठी अहिँसक मार्गाने प्रखर लढा देणे ही आपली संस्कृती आहे, संघटनेचे संस्कार आहेत. त्यामुळे आजच्या लढ्याने सरकार हादरले असून त्यांनी आपल्या मागण्यांची दखल घेतली. म्हणून आज आपण थांबत आहोत, मात्र लढाई अटळ आहे, ती थांबणार नाही असे सांगत संस्थापिका विद्युल्लता पंडित यांनी सर्व सहभागी सभासदांचे कौतुक केले. 

काय म्हणाले विवेक पंडित?

स्वातंत्र्य लढ्याची हीच सुरुवात आहे- विवेक पंडित 

मोर्चा निघाल्यानंतर झालेल्या आजच्या बैठकीबाबत विवेक पंडित यांना विचारले असता ते म्हणाले “आजची मुख्यमंत्री उद्धवजींसोबत झालेली चर्चा अत्यंत सकारात्मक आणि त्यांची सरकारची भूमिका स्वागतार्ह आहे. कालबद्ध कार्यक्रम आणि त्याची अंमलबजावणी ही ठरल्याप्रमाणे होईल अशी अपेक्षा आहे, यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही जागृत राहायला हवे , अंमलबजावणीसाठी कृती कार्यक्रम राबवावा लागेल असे विवेक पंडित यांनी सांगितले. आमची लढाई ही स्वातंत्र्याच्या प्रकाशासाठीची,मूलभूत हक्काची आहे. प्रश्नांवर  सरकार सकारात्मक असेल तर सहकार्य असेल अन्यथा आमचा रस्त्यावर उतरून लढण्याचा निर्धार कायम आहे असेही पंडित यांनी सांगितले. पंडित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत केले. 

आजचा मोर्चा केवळ इशारा नव्हता, आपली ठाण मांडून बसण्याच्या, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडकण्याच्या तयारीत आलेलो, म्हणून आज आपण जिंकलो. सरकारने आपले ऐकून घेतले, आपण मागतो त्या मागण्या मान्य करण्याची तयारी दाखवली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात  कुणीही उपाशी नको, कुणीही बेघर नको, कुणालाही उपचाराविना मरावे लागु नये, कुणालाही रोजगाराच्या शोधत भटकावे लागू नये हाच स्वातंत्र्याच्या प्रकाशाचा अर्थ आहे. या मागण्या मान्य झाल्यातर स्वागतच आहे, पण जर विश्वासघात झाला तर संघटनेची खरी ताकद सरकारला दाखवू असे सांगत विवेक पंडित यांनी मोर्चाचा समारोप केला.

आजच्या ठाण्यातील मोर्चाचे नेतृत्व संघटनेच्या उपकार्याध्यक्ष स्नेहा दुबे पंडित यांनी केले, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत चर्चेसाठी गेलेल्या शिष्टमंडळात संघटनेचे संस्थापक विवेक पंडित, संस्थापिका विद्युल्लता पंडित , अध्यक्ष रामभाऊ वारणा ,सरचिटणीस बाळाराम भोईर, सुलतान पटेल, यांचा समावेश होता. मोर्चामध्ये कार्याध्यक्ष केशव नानकर राज्य उपाध्यक्ष  दत्तात्रेय कोळेकर, उपकार्याध्यक्ष स्नेहा दुबे पंडित, सरचिटणीस विजय जाधव, ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे, पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश रेंजड, युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार, महिला जिल्हा प्रमुख जया पारधी, शेतकरी जिल्हा प्रमुख संगीता भोमटे, नाशिक जिल्हा सचिव भगवान मधे, सीता घाटाळ, पूजा सुरुम आदींनी आपली मनोगतं व्यक्त केली. सूत्रसंचालन जिल्हा सचिव राजेश चन्ने, गणेश उंबरसडा, दशरथ भालके यांनी केले. ठाण्यातील शिष्टमंडळाने।जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनाही एक निवेदनाची प्रत सुपूर्द केली. 
मुंबईकडे जाण्याच्या तयारीत असलेल्या या हजारो आदिवासींच्या मोर्चाचा यशस्वी समारोप ठाण्यातच झाल्याने प्रचंड धावपळ झालेल्या पोलीस बांधवांनी समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here