कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन लालपरी पालघरमध्ये दाखल; विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले..!

0
513
संग्रहित

पालघर – योगेश चांदेकर:

राजस्थानमधील कोटा येथे महाराष्ट्रातील सुमारे दीड हजारांवर विद्यार्थी अडकले होते. यामध्ये पालघर जिल्ह्यातील ५२ विद्यार्थ्यांचा समावेश होता. या ५२ विद्यार्थ्यांपैकी पालघर-बोईसर येथील १८ व वसई-विरार येथील ३४ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजस्थान सरकारशी संपर्क साधला होता. लॉकडाऊनच्या काळात देशभरात संचारबंदी लागू असल्याने तसेच राज्यातही जिल्हाबंदी असल्याने कोणालाही पूर्वपरवानगीशिवाय परजिल्ह्यात जाता येत नव्हते. मात्र राज्य शासनाच्या प्रयत्नांनी कोटा येथील अडकलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना आज सुखरूप महाराष्ट्रात आणण्यात आले. पालघरमध्ये परतताच या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदी छटा उमटली आहे. पालघर-बोईसर येथील १८ विद्यार्थ्यांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी केली जाणार असून त्यांना चाचणी अहवाल प्राप्त होईपर्यंत पालघरमधील साई बाबा नगर येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे.

कोटामधील (राजस्थान) विद्यार्थ्यांना लवकरात लवकर परत आणण्यासाठी शासनाने राज्याच्या उत्तर सीमेवरील व कोटाजवळचा जिल्हा म्हणून धुळे जिल्ह्यातून बसेस सोडण्याचे नियोजन केले. यासाठी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी धुळे जिल्ह्यातून ७० बसेस कोटाकडे रवाना केल्या होत्या. प्रथम कोटा येथून सर्वच विद्यार्थ्यांना धुळे येथे आणण्यात आले. त्यानंतर पालघरमधील विद्यार्थ्यांना नाशिक मार्गे पालघर येथे आणण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब यांचे आभार मानले. तसेच जि. प. अध्यक्षा कामडी, युवती अधिकारी दीक्षा संखे व जिल्हा प्रशासनाने केलेल्या सततच्या पाठपुराव्याबद्द्लही विद्यार्थ्यांनी आभार मानले.

जेईई, नीट यांसारख्या प्रवेश परीक्षांच्या अभ्यासासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी राजस्थानमधील कोटा येथे जात असतात. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे या विद्यार्थ्यांना स्वघरी परतता आले नव्हते. त्यामुळे गेल्या महिन्याभराहून अधिक कालावधीपासून हे विद्यार्थी कोटा येथील आपल्या वसतीगृहांवर थांबून होते. तर इकडे त्यांच्या पालकांचे संपूर्ण लक्ष या विद्यार्थ्यांकडे लागून होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here