सोशल मिडियावरील ‘आवाज’ आला मदतीला; गर्भवतीला माणुसकीचे दर्शन

0
428

पालघर – योगेश चांदेकर:

कामाकरिता गेलेला पती लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकलाय… पत्नी गर्भावस्थेत असून डहाणू तालुक्यातील हळदपाडा येथे माहेरवाशीन झालीय… पत्नीसोबत चार वर्षांची लहान मुलगी आणि म्हातारी आई. गरीब कुटुंब बाका संकटात सापडले असताना सोशल मीडियावर एक संदेश व्हायरल झाला आणि एकाच दिवसात गर्भवती असलेल्या गरजू महिलेला औषधे उपलब्ध करून देण्याचा चमत्कार घडला. आवाज कला संघ, भारत या वारली चित्रकारांच्या संस्थेने पुढाकार घेऊन या महिलेला औषधे उपलब्ध करून दिली.

देशातील लॉकडाऊनमुळे खेड्यातील अनेक तरुण शहरात अडकून पडले आहेत. डहाणू तालुक्यातील वाणगाव येथील वारली चित्रकार सचिन भावर व तलासरीचे सचिन भुरकुड हे कामानिमित्त पुणे येथे गेले होते. मात्र संपूर्ण देशात लॉकडाऊन झाल्याने दोघेही पुण्यात अडकले.त्यापैकी सचिन भुरकुड यांची पत्नी गर्भवती असल्याने तिला हळदपाडा येथे माहेरी ठेवण्यात आले होते. गर्भावस्थेत असल्याने तिच्यावर डॉक्टरांकडून औषधोपचार सुरू होते. परंतु, पत्नीची औषधे संपल्याने भुरकुड यांची चिंता वाढली. वेळेवर औषधे मिळाली नाहीत तर पत्नीचे काय होईल ? या विचाराने त्यांचे मन सुन्न झाले.

त्यांनी व्हाट्सएपच्या माध्यमातून आदिवासी वारली जमाती कला संघ, भारत ( आवाज )या संस्थेच्या अध्यक्षांशी संपर्क साधला. त्यानुसार वेगाने चक्रे फिरली. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांच्या प्रिसक्रिप्शन पावतीचा फोटो पत्नीने पुण्यातील पतीकडे पाठवला. तो फोटो आवाज च्या अध्यक्षांना मिळताच त्वरित औषधे खरेदी केली. मात्र, कोणीही घराबाहेर पडत नसल्याने ही औषधे पाठवायची कशी? असा प्रश्न उभा राहिला. आवाज चा व्हाट्सएप ग्रुप व फेसबुकवर याबाबत टाकलेला संदेश धुंदलवाडीचे सामाजिक कार्यकर्ते वसंत भसरा यांनी पाहिला. त्यांनी वेदांत हॉस्पिटलमध्ये एम्ब्युलन्स ड्रायव्हर लक्ष्मण महाले यांच्याशी संपर्क साधून आवाज संस्थेच्या अध्यक्षांना गाठले. अशा प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून एका आदिवासी गर्भवती महिलेला अत्यंत कठीण प्रसंगी मदत मिळाली. याकामी आवाज संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक चंद्रकांत खुताडे, सचिव प्रसिद्ध वारली चित्रकार राजेश मोर, खजिनदार चेतन माढा यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here